संजय राऊत, तुमच्या टोपीची काळजी करा

कोल्हापूर:  ‘दादा हवा जोरात आहे. तुमची टोपी उडेल,’ असे म्हणणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या टोपीची काळजी करावी. ज्या आमदारांच्या जीवावर ते मोठे झाले आहेत, ते बाहेर पडले आहेत. हिंमत असेल तर राऊत यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा राज्यसभेवर निवडून येऊन दाखवावे’, असे आव्हान उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले. ‘देशात बदलाचे चित्र असे म्हणणारे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहेत’, असा टोलाही त्यांनी लगावला. श्री. पाटील दौलतनगर येथे मोफत फिरता दवाखान्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.श्री. पाटील म्हणाले, ‘राऊत वैफल्यग्रस्त झाले आहेत. शिव्याशाप देत आहेत. त्यांना मी एन्जॉय करतो. त्यांनी हिंमत असेल तर राजीनामा द्यावा. कसब्यातील निवडणुकीबाबत मी दोन दिवसांत विश्‍लेषण करणार आहे. माझ्यावर शाईफेक झाली, तरी मी परत आलो.

 यामुळे विरोधक हैराण झाले आहेत. माझी कोंडी करण्यासाठी ते हरतऱ्हेने प्रयत्न करीत आहेत. तरीही मी त्यांना सापडत नाही. त्यांच्यासाठी मी ‘सॉफ्ट टार्गेट’ आहे. त्यामुळे कसब्यातील पराभवाचे फ्लेक्स कोल्हापुरात उभारले गेले आहेत.’पंतप्रधानांना नऊ राज्यांनी ‘ईडी’चा गैरवापर थांबवावा, या मागणीचे पत्र पाठविले आहे, यावर ते म्हणाले, ‘कसब्यात आम्ही निवडणूक जिंकली असती तरी त्यांनी ‘ईव्हीएम’कडे बोट दाखवले असते. सारे प्रयत्न करून यश मिळत नसल्याने विरोधक हताश झाले आहेत. चिंचवडच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनाम्याची तयारी दाखवावी. सोशल मीडियावरून माझ्यावर खापर फोडले जात आहे. पण, देशातील काँग्रेसच्या आमदारांची संख्या १६ टक्के खाली आली आहे, याकडेही पाहावे.’



धनंजय महाडिकांच्या केंद्रीय मंत्रिपदासाठी आग्रह धरणार

भाजप आरोग्यसेवा उपलब्ध करण्याचे काम करीत आहे. त्याचे पुण्य धनंजय महाडिक यांना मिळेल. त्यांना अधिक चांगले देण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावेळी त्यांच्यासाठी कोअर कमिटीकडे तसा आग्रह धरला जाईल, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

शेट्टींना पुन्हा महायुतीत आणण्याचा प्रयत्न

‘स्वाभिमानी शेतकरी संघटना आमच्याबरोबर होती. मधल्या काळात दूर गेली. मात्र, माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी आमचा नेहमी संवाद सुरू असतो. त्यांना पुन्हा एकदा महायुतीत आणण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच, रासप कोठेही गेलेली नाही. ती आमच्यासोबत आहे’, असे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.

स्वतंत्र लढण्याचा निर्णय - राजू शेट्टी

मंत्री पाटील यांच्या विधानाबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की यापूर्वीच आमचा स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने