''मराठी कलाकार राजकारणात आले तर..'', अनेक खुलासे करत कोल्हेंनी उडवली खळबळ

मुंबई:   डॉ. अमोल कोल्हे हे आता केवळ अभिनेता नाहीत तर राजकीय नेते देखील आहेत. राजकीय प्रवेशानंतरही अमोल कोल्हेंनी मनोरंजनातील आपलं काम सुरुच ठेवलं आहे. ऐतिहासिक भूमिका गाजवण्याचं काम डॉ.अमोल कोल्हे नेटानं करत आहेत. त्यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज जेवढे लोकांना भावले तितकेच त्यांनी साकारलेले छत्रपती संभाजी महाराज प्रेक्षकांना पटले..रुचले...आता छत्रपती शिवाजी महाराज साकारण्याचा १६ वर्षांचा इतका दांडगा अनुभव असूनही डॉ.अमोल कोल्हेंना केवळ राजकीय नेता असल्यामुळे नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेला आवाज देण्यासाठी रिजेक्ट करण्यात आलं.



असे अनेक खुलासे एका व्हिडीओच्या माध्यमातून करत डॉ.अमोल कोल्हे यांनी मराठी कलाकारांनी राजकारणात यावं का? असा प्रश्नही निर्माण केला आहे.चला,जाणून घेऊया व्हिडीओत डॉ. अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले आहेत.डॉ.अमोल कोल्हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भलतेच सक्रिय पहायला मिळतात. ते अनेकदा आपल्या राजकीय तसंच मनोरंजन क्षेत्रातील कामासंबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. नुकत्याच शेअर केलेल्या त्यांच्या व्हिडीओची तर भलतीच चर्चा रंगली आहे. कारण यामध्ये कोल्हेंनी राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांच्या वाट्याला आलेलं रीजेक्शन याचे खुलासे करत मराठी कलाकारांनी राजकारणात यावं का असा थेट सवाल केला आहे. तसंच माझ्या रक्तात लढणं आहे..मी या समस्येला वाचा फोडणार असं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

डॉ. अमोल कोल्हे आपल्या व्हिडीओत म्हणालेयत, ''रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित एक लाइट अॅन्ड म्युझिक शो होणार होता. तेव्हा शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेला आवाज द्याल का अशी मला विचारणा झाली. महाराजांचे काम असल्यामुळे मी मागचा-पुढचा कोणताच विचार न करता हो म्हटलं''.''मानधनाची विचारणा झाली तेव्हा म्हटलं,बंद पाकिटात जे द्याल ते प्रेमानं स्विकारेन. त्यानंतर कार्यक्रमाच्या पाच ते सहा दिवस आधी मला कॉल करुन सांगण्यात आलं की,तुमचा आवाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेला सूट होत नाही..आणि अशाप्रकारे मला रिजेक्ट करण्यात आलंटट.

''तेव्हा सुरुवातीला हे ऐकून मी हैराण झालो..हे कसं शक्य आहे..पण नंतर कळलं की सरकारी कार्यक्रम असल्यानं सगळी सूत्र वरनं हलली आहेत...मग मात्र मी विषय समजून तो सोडून दिला. आणि हेच पुन्हा एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याबाबतीत झालं.. त्या प्रायोजकांना एका ठारविक पक्षाचा नेता असणं खटकलं बहुधा''.''पण एक प्रश्न मात्र माझ्या मनात निर्माण झाला तो म्हणजे कलाकार आणि राजकारण याची सरमिसळ का करतात? मी राजकारणात आहे हा माझा गुन्हा आहे का ज्यामुळे माझ्यातल्या कलाकाराला नाकारलं जातंय?''

डॉ. अमोल कोल्हेंचा हा व्हिडीओ सध्या जोरदार चर्चेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने