'हलगीचा आवाज ऐकून मेलो तरी उठून बसेल'

मुंबई: मी दरवेळी नवे कलाकारच नव्हे तर, नव्या कथा घेऊन येतो. त्यामुळेच ते चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरतात. ‘घर बंदूक बिर्याणी या चित्रपटात तीन कलाकार याच विद्यापीठातील आहेत. त्यामुळे पुढच्या चित्रपटाची ऑडिशन विद्यापीठात घेऊ, असे सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सांगितले.सोमवारी (ता. २७) रंगभूमी दिन असून नाट्य विभागालाही यंदा ५० वर्षे पुर्ण होत आहे. यानिमित्त आयोजित विद्यापीठाच्या नाट्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी रविवारी (ता.२६) श्री. मंजुळे हे बोलत होते.



याप्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले होते. घर बंदूक बिर्याणीचे कलाकार तथा सिने कलावंत सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील, झी स्टुडिओ चे मंगेश कुलकर्णी, आश्विन पाटील, नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. स्मिता साबळे यांची उपस्थिती होती.श्री. मंजुळे म्हणाले, ‘आपला कारभार मराठीचाच आहे. हलगीवर प्रचंड प्रेम आहे. तिचा आवाज ऐकून मेलो तरी, मी उठून बसेल. पटकथा लिहीत असताना सयाजी शिंदे यांना घ्यायचे ठरवले. सैराट जसा दीड वर्षे लपविला. तसेच याचेही गुपित लपविले आहे.सुरुवात चुकवू नका. शेवट सांगू नका. असेच काहीसे याही चित्रपटात आहे.’ ‘या चित्रपटातील कलाकारांसोबत काम करताना भारी वाटले. मलाही असे वाटले, यांच्यासारखे काम आपल्याला जमले पाहिजे.’ असे आकाश ठोसर म्हणाला. सायली पाटील हिने ‘इथे जे वातावरण आहे, तेच थिएटर मध्ये पाहायला मिळेल.’ असा आशावाद व्यक्त केला.

विद्यापीठातील दोन कलाकार

चरण जाधव, प्रवीण डाळिंबकर हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नाट्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी चित्रपटात असल्याचे नागराज मंजुळे यांनी सांगितले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या दोन कलाकारांचे काम नक्कीच आपल्या शहरातील तसेच राज्यातील नागरिकांना आवडेल असा विश्वास नागराज मंजुळे यांनी व्यक्त केला.

आपली श्रद्धा कमी पडते : सयाजी शिंदे

आता मराठी चित्रपट कसे येतात, ते साऊथवाल्यांना कळेल. हा चित्रपट तुमच्या रक्तात उतरेल. नागराज यांनी नव युग आणले आहे. कलाकार कुठेही असतो, मात्र तो शोधावा लागतो, ते काम नागराज करतो.तो दिग्दर्शक म्हणून माहिती आहे, आता कलाकार म्हणून तुम्हाला कळेल. चित्रपटांवर ‘साऊथ’ची श्रद्धा जास्त आहे. आपली मराठीची थोडी कमी पडते. असे सयाजी शिंदे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने