राहुल गांधींच्या शिक्षेविरोधात काँग्रेस मोठ्या आंदोलनाच्या तयारीत; आज राष्ट्रपतींची घेणार भेट!

दिल्ली: सुरतच्या एका न्यायालयानं गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'मोदी आडनाव' संबंधी केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलं.न्यायालयानं त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, वायनाडच्या खासदाराला 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर लगेच जामीन मिळाला. राहुल गांधींनी 'सर्व चोरांचे मोदी हेच आडनाव का आहे?', असं कथित वक्तव्य केल्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.आता याच पार्श्वभूमीवर, काँग्रेसनं मोठ्या आंदोलनाची तयारी सुरु केली आहे. राहुल गांधींच्या शिक्षेविरोधात काँग्रेसनं रस्त्यावर उतरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची इतर पक्षांसोबत भेट घेण्याचा निर्णय घेतलाय. मुख्य विरोधी पक्षानं न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेचच जनआंदोलनाची घोषणा केली.



मल्लिकार्जुन खर्गेंच्या निवासस्थानी बैठक

या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे  यांनी गुरुवारी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदारांची त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली. बैठकीत सुमारे तासभर चर्चेनंतर शुक्रवारी विजय चौकात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश  यांनी पत्रकारांना सांगितलं की, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी 50 हून अधिक खासदार, काँग्रेस सुकाणू समितीचे सदस्य आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. बैठकीत शुक्रवारी सकाळी 10 वाजता सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांना बैठकीसाठी बोलावलं आहे. यानंतर सकाळी 11.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व विरोधी पक्ष संसद भवन ते विजय चौकापर्यंत पायी मोर्चा काढणार आहेत. विरोधी पक्षांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडं दुपारी हे प्रकरण मांडण्यासाठी वेळ मागितला आहे, असं त्यांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने