"सदू आणि मधू भेटले", CM शिंदे-राज ठाकरे यांच्या भेटीवर संजय राऊत खोचक विधान

मुंबई:  शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल (२६ मार्च) मालेगाव येथे भव्य जाहीर सभा झाली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.संजय राऊत म्हणाले की, "भेट घेतली त्याचं आम्ही काय करणार. सदू आणि मधू भेटले. बालभारतीत आम्हाला एक धडा होता सदू आणि मधू भेटल्याचा. भेटू द्या ना. जुने मित्र असतील ते किंवा नव्याने प्रेम उफाळून आलं असेल कोणाचं. काल मालेगावात जी विराट सभा झाली त्यानंतर त्यांच्या भावना उचंबळून आल्या असतील, एकमेकांचे अश्रू पुसायला गेले असतील" अशा शब्दात खोचक टीका संजय राऊत यांनी केली.



उद्धव ठाकरेंच्या मालेगाव येथील सभेनंतर एकनाथ शिंदे उत्तर सभा घेणार यावर बोलताना राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना काहीच काम नाहीये. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम नैऋत्य अग्नेय अशा दिशांना सभा घेण्याचा छंद जडला आहे. दुसरं काम काय आहे त्यांना. राज्य कारभार करावं म्हणावं नीट. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा वाढतायत ते समजून घ्या असेही राऊत म्हणाले.देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या विधानभवनाबाहेरील भेटीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मला लोकसभेच्या लॉबीत मोदी रोज भेटतात, अमित शहा जेपी नड्डा भेटतात, याचा अर्थ काय घ्याल. उद्या फडणवीस याच्या जागी दुसरं कोणी मुख्यमंत्री झालं तरी रस्ता तोच आहे. विरोधकांना वेगळा आणि राज्यकर्त्यांसाठी वेगळा रस्ता असं तरी अजून काही नाही असे संजय राऊत म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने