काय करू हिच्या ऑनलाईन खरेदीच्या सोसाला?

कोल्हापूर: “सध्या मी खूप आर्थिक ताणात आहे आणि या ताणाला कारण आहे माझ्या बायकोची नियोजनशून्य मूर्खपणाची, अतिखरेदी करायची सवय! बायकोला घेऊन येतो, तुम्ही तिचे कौन्सेलिंग करा. मी तिला काही जरी सांगायला गेलो, तरी आमची जोरदार भांडणे होतात.” अनिलने असे बोलून त्याची हकीकत सांगितली.अश्विनी आणि अनिल शहरात राहणारे असले, तरी दोघांची मूळ घरे खेडेगावामध्ये. अश्विनी तिच्या गावाजवळच्या कॉलेजातून बी.ए. झालेली. अनिल मात्र दहावीनंतर शिक्षणासाठी शहरात आला. बी.कॉम करताना कॉम्प्युटरचे काही कोर्सेस केले आणि शहरात एका मॉलमध्ये कॅश काऊंटरवर कामाला सुरुवात केली. आता तो दुसऱ्या एका मॉलच्या बॅक ऑफिसला काम करतो. दोनच वर्षांपूर्वी त्याचे अश्विनीशी लग्न झाले.

अनिलने नोकरी बदलली तेव्हा स्वतःचे घरही घेतले आणि त्यासाठी कर्ज काढले. त्याचा दर महिन्याला हप्ता कट होऊनच पगार हातात येतो. सुरुवातीला त्याने त्याला आवश्यक वाटणाऱ्या किरकोळ गोष्टी घरात घेतल्या होत्या.अश्विनी घरात आल्यानंतर त्याने आधी टी.व्ही., मग फ्रीज अशा मोठ्या खरेदी केल्या. त्यावेळी हातात फारसे पैसे नव्हते म्हणून क्रेडिट कार्ड वापरले. शिवाय घराचा हप्ताही सुरू होता. सगळे हप्ते जाऊन हातात येणाऱ्या पगारात दोघांचे तसे भागत होते; पण मग सुरुवातीला अश्विनीचे साधे कपडे घालणे, कुणाच्या घरी जाताना साडीच नेसणे, अनिलला गावंढळपणाचे वाटू लागले.

मग त्याने तिच्यासाठी पाच-सहा ड्रेसेसची खरेदी केली. तीही क्रेडिट कार्ड वापरून. महिन्याचा बाजार भरतानाही क्रेडिट कार्डच वापरावे लागू लागले. सहा महिन्यांत क्रेडिट कार्डचे पैसे भागवणेच मुश्कील होऊन बसले. तेव्हा इकडून तिकडून पैसे गोळा करून, सासूरवाडीतून जावयाला घातलेली चेन, अंगठी विकून सगळे क्रेडिट कार्ड वरचे पैसे भागवले. आता पुन्हा क्रेडिट कार्डवर असेच भरपूर पैसे भरायचे राहिले आहेत.अनिल सांगत होता, “मॅडम, त्या क्रेडिट कार्डला जो मोबाईल नंबर जोडलाय, तो असतो अश्विनीकडे. त्यावर अक्षरशः ढीगाने कपड्यांच्या, भांड्यांच्या, कॉस्मेटिकच्या अशा बऱ्याच ऑफर्स येत असतात. अश्विनी त्याच्या मोहात पडते आणि ऑनलाईन खरेदी करून रिकामी होते. तिच्या कपड्यांना आता कपाट पुरेना झाले आहे.



नेलपेंट, लिपस्टिक तर अक्षरशः टोपलीभर आहेत. वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत. ती सगळी वापरलीही जात नाहीत. मला आता वाटतंय, झक मारली आणि हिला क्रेडिट कार्ड दिले. ऑनलाईन शॉपिंग शिकवले. तिने ऑनलाईन मागवलेली प्रत्येक गोष्ट कशी आवश्यकच आहे, हे मला ती पटवून देते.त्या क्रेडिट कार्डच्या बिलांनी माझी झोप उडाली आहे. तिला काही सांगायला गेलो तर वादच होतात. आता क्रेडिट कार्डचे लिमिट संपले आहे. त्यामुळे गेले महिनाभर किराणामालाची सुद्धा खरेदी गरजेपुरती रोखीने चालू आहे. तर अश्विनी इतकी अस्वस्थ आणि बेचैन आहे, की सारखी काही ना काही निमित्त काढून वाद घालत असते.

आता तिचे सोने मोडून हे पैसे भागवण्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नाही आहे. ती त्याला तयार होणार नाही आणि कशीबशी तयार झालीच, तर नंतर अशी अवस्था पुन्हा येणार नाही, याची गॅरंटी नाही. अश्विनीला एक प्रकारचे ऑनलाईन शॉपिंगचे व्यसनच लागले आहे. तिला त्यातून बाहेर काढायची आहे.”झालेय असे की, एकतर तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जगातल्या अनेक देशांमध्ये चैनीच्या वस्तूंचे खूप जास्त उत्पादन होते. त्याची विक्री करण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असते. मग लोकांनी गरज नसताना खरेदी करावी यासाठी मार्केटिंगचे वेगवेगळे फंडे वापरले जातात.

यामध्ये सवलतींचे अमिष दाखवणे, अधून मधून सेल लावणे, हप्त्यावर वस्तू उपलब्ध करणे, क्रेडिट कार्ड वरून खरेदीसाठी वारंवार मोबाईलवर मेसेजिंग करणे, असे अनेक प्रकार येतात. एका क्लिकसरशी घरपोच मिळणारी वस्तू याचे जसे आकर्षण असते, तसे क्रेडिट कार्डवरून खरेदी करताना लगेचच पैसे द्यावे लागत नाहीत.त्यामुळे पुढचे पुढे बघू, नंतर जमतील पैसे द्यायला, अशी मानसिकता होते. पैसे खर्च करण्याचा ताण खरेदी करता येत नाही आणि मग आपण किती पैसा कारण नसताना घालवला, याचे भानही राहत नाही. अनावश्यक खरेदी वाढत जाते.

पैसे पुरेनासे झाले की ताण येतो. जवळच्या नात्यात वाद सुरू होतात. निराशा येते. निराशेवर उपाय म्हणून पुन्हा मोबाईलवर ऑनलाईन सर्चिंग सुरू होते आणि खरेदी करण्याचा मोह अनावर होतो. कुठेतरी या चक्रव्यूहाचा भेद आपला आपणच करावा लागतो. नाहीतर मौल्यवान नातेसंबंध, पैसा आणि आवश्यक अशा गरजेच्या गोष्टी या सगळ्यांमध्ये तडजोड करण्याची वेळ येते. ही तडजोड खूप त्रासदायक ठरू शकते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने