अल्टिमेट टेबल टेनिस लीग बालेवाडीत रंगणार

 पुणे : भारतातील अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात होणार आहे. १३ जुलै २०२३ पासून अल्टिमेट टेबल टेनिसच्या स्पर्धेला सुरुवात होणार असून ३० जुलै रोजी जेतेपदाचा सामना होणार आहे. या स्पर्धेमध्ये भारतातीलच नव्हे, तर जगभरातील खेळाडूंचा सहभाग असल्यामुळे क्रीडाप्रेमींसाठी ही पर्वणी असणार आहे.भारतीय टेबल टेनिस फेडरेशनच्या विद्यमाने सर्वांत प्रथम २०१७ रोजी नीरज बजाज आणि विता दानी यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. यानंतर टेबल टेनिस विश्वात ही स्पर्धा गेमचेंजर म्हणून ओळखली गेली. भारतात जागतिक दर्जाचे टेबल टेनिसपटू आणण्याबरोबरच अल्टिमेट टेबल टेनिसच्या स्पर्धेत शरथ कमल, साथियान जी., मानव ठक्कर, सुतीर्थ मुखर्जी आणि मनिका बत्रा यांसारख्या स्टार भारतीय खेळाडूंचा दर्जेदार खेळ अनुभवायला मिळाला, ज्यांनी सुरुवातीच्या हंगामात अप्रतिम कामगिरीने देशाचे लक्ष वेधून घेतले.

‘‘अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यामागे आमचे मुख्य उद्दिष्ट भारतात या खेळाला लोकप्रिय करणे हे होते; मात्र ही स्पर्धा काही कारणास्तव २०१९ सालानंतर होऊ शकली नाही, परंतु आता या स्पर्धेचा थरार पुन्हा रंगणार आहे. भारतातील टेबल टेनिस एका जागतिक स्तरावर नेण्यासाठी आम्ही तयार आहोत’’, असे नीरज बजाज यांनी सांगितले.२०१९ मध्ये अल्टिमेट टेबल टेनिसच्या स्पर्धेचे दिल्लीत अयोजन करण्यात आले होते. या वेळी भारतीय टेबल टेनिसचे दिग्गज शरथ कमलच्या नेतृत्वाखाली चेन्नई लायन्सने साथियानच्या दबंग दिल्लीचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. २०१८ रोजी मनिका बत्रा आणि साथियान यांच्या नेतृत्वाखालील दबंग दिल्लीने; तर २०१७ रोजी फाल्कन्सने या स्पर्धेत बाजी मारली होती.



‘‘कोरोनामुळे अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेला ब्रेक लागला होता; मात्र आता आम्हाला या स्पर्धेच्या पुनरागमनाची घोषणा करताना खूप आनंद होतोय. भारतीय टेबल टेनिस फेडरेशनशी हातमिळवणी करून आम्ही देशातील प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देत राहू. तसेच आम्हाला पाठिंबा दिल्याबाबद्दल मी फेडरेशनचेदेखील आभार मानते’’, असे अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेचे प्रमुख विता दानी म्हणाल्या.

सहा संघांमध्ये जेतेपदाची झुंज

यू मुंबा, पुणेरी पलटण, गोवा चॅलेंजर्स, दबंग दिल्ली आणि कोलकाता हे संघ नेहमीप्रमाणे यंदाही कायम राहणार आहेत. या वर्षी मात्र या स्पर्धेत बंगळूर स्मॅशर्स या नव्या संघाचाही समावेश होईल. या संघाचे मालक पुनित बालन हे आहेत.ते अल्टिमेट खो-खो, टेनिस लीग आणि हँडबॉल लीगमधील फ्रँचायझीमध्ये गुंतवणूकदार आहेत. ‘‘टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाला खेळाच्या वाढीसाठी कटिबद्ध असलेल्या लीगला पाठिंबा देण्याचा आनंद आहे’’, असे टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा मेघना अहलावत व महासचिव कमलेश मेहता यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने