बेरोजगार पदवीधरांना तीन हजार भत्ता देणार ; राहुल गांधी

बेळगाव : देशातील सर्वाधिक भ्रष्ट सरकार कर्नाटकात आहे. या सरकारच्या कार्यकाळात बेरोजगारी कमालीची वाढली आहे. युवकांना रोजगार मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यास बेरोजगार पदवीधरांना तीन हजार आणि डिप्लोमाधारकांना १५०० रुपये बेरोजगार भत्ता देऊ, अशी महत्त्वाची घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी ही काँग्रेसची आतापर्यंतची चौथी घोषणा ठरली आहे.काँग्रेसतर्फे आज (ता. २०) युवा क्रांती मेळावा सीपीएड्‍ मैदानावर आयोजिला होता. यावेळी ते बोलत होते. ‘नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान हमने खोली है,’ असे म्हणत राहुल यांनी भाषणाला सुरुवात केली.

ते म्हणाले, ‘‘श्रीमंत आणि धनदांडग्यांना पाठीशी घालणारे आणि प्रचंड द्वेष पसरविणारे हे केंद्र व राज्य सरकार आहेत. कर्नाटकातील भाजप सरकार देशातील सर्वाधिक भ्रष्टाचार करणारे आहे. ‘४० टक्के कमिशन’ प्रत्येक कामासाठी घेण्यात येत आहे. यामुळे राज्याचा विकास खुंटला आहे. बेरोजगारी वाढत आहे. सरकारी रिक्त जागा भरण्यात आल्या नाहीत. शिवाय काही जागा भरण्यासाठी अधिसूचना काढल्या होत्या.त्यात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले. यामुळे पोलिस भरती, अभियंता भरती आणि इतर भरती चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. युवा वर्गापुढे रोजगाराचे गंभीर प्रश्‍न ठाकले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून बेरोजगार भत्ता घोषित करण्यात येत आहे. त्यानुसार पदवीधरांना तीन हजार आणि डिप्लोमाधारकांना पंधराशे रुपये बेरोजगार भत्ता दोन वर्षापर्यंत मिळेल.’’



राहुल पुढे म्हणाले,‘‘काँग्रेसतर्फे यापूर्वी गृहिणींना दर महिन्याला दोन हजार रुपये देण्याचे घोषित केले आहे. प्रत्येक घराला दोनशे युनिट मोफत वीज देण्याचे जाहीर केले आहे. १० किलो तांदूळ देण्याचीही घोषणा झाली आहे. त्याला जोडून चौथी घोषणा ही बेरोजगारी भत्ता आहे. यामुळे युवकांना आर्थिक आधार मिळेल.’’काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ‘‘गेल्या महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेळगावात माझ्यावर टीका करताना रिमोट कंट्रोलवर चालणारे अध्यक्ष असल्याचा आरोप केला आहे. मी रिमोटवर चालणारा अध्यक्ष असेन, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा कोणाच्या रिमोटवर चालतात, हेही एकदा मोदी यांनी एकदा उघड करावे. भाजप कमालीचा द्वेष पसरवत आहे. अदानीचा विषय सभागृहात मांडल्यानंतर ते कामकाजातून काढून टाकले. यामुळे धनदांडग्यांना पाठीशी घातले जात आहे. ते स्पष्ट होत आहे.’’कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले, ‘‘राज्यामध्ये पक्षाची सत्ता आल्यास भ्रष्टाचार नियंत्रणासाठी कायदा आणण्यात येईल. काँग्रेसचे १४० पेक्षा अधिक उमेदवार विजयी होतील.’’सिध्दरामय्या म्हणाले, ‘‘भ्रष्टाचार लपविण्यासाठी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे केला जात आहे.’’ स्वागत काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी केले.

आमदारांची मराठीतून भाषणे

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार अंजली निंबाळकर यांनी मराठीतून भाषणे केली. आगामी निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून मराठी भाषकांना कुरवाळणे सुरू आहे, अशी चर्चा होती.

सभेला प्रचंड गर्दी

आगामी विधानसभा निवडणुकीनिमित्त काँग्रेसकडून आयोजित केलेल्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. बेळगावसह उत्तर कर्नाटकातून लोक सभेला उपस्थित होते. तसेच, सभेसाठी व्यापक फलक आणि स्वागत कमानी उभारल्या होत्या. राहुल यांचे आगमन झाल्यानंतर ‘राहुल... राहुल...’अशा घोषणा कार्यकर्त्यांतून देण्यात येत होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने