बोपन्नाचे विक्रमी विजेतेपद

मुंबई:  भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपन्ना याने रविवारी विक्रमाला गवसणी घातली. त्याने ऑस्ट्रेलियाचा त्याचा साथीदार मॅथ्यू एब्डेन याच्या साथीने इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स १००० या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात विजेतेपद पटकावले. वयाच्या ४३व्या वर्षी इंडियन वेल्स मास्टर्स १००० स्पर्धा जिंकणारा तो पहिलाच टेनिसपटू ठरला आहे.४३ वर्षीय बोपन्ना व ३५ वर्षीय मॅथ्यू या जोडीने ग्रेट ब्रिटनचा नील स्कूपस्की व नेदरलँडचा वेस्ली कूलहोफ यांच्यावर ६-३, २-६, १०-८ असा विजय साकारला आणि झळाळता करंडक पटकावला. दरम्यान, याआधी बोपन्ना - मॅथ्यू या जोडीने पहिल्या फेरीत राफेल मातोस - डेव्हिड हर्नांडीझ या जोडीला पराभूत केले. त्यानंतर फेलिक्स एलियासिम - डेनिस शॅपोवालोव या जोडीला पराभूत करीत त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. बोपन्ना - मॅथ्यू जोडीने उपांत्य फेरीत गतविजेता जॉन इस्नर - जॅक सॉक या जोडीवर मात करीत सनसनाटी निर्माण केली.



नेस्टरला मागे टाकले

कॅनडाच्या डॅनियल नेस्टर याने २०१५ मध्ये सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्या वेळी त्याचे वय ४२ होते. रोहन बोपन्नाने नेस्टरचा हा विक्रम मागे टाकले. बोपन्ना याप्रसंगी म्हणाला, ही स्पर्धा जिंकल्यानंतर नेस्टरसोबत बोललो. त्याचा विक्रम मोडल्याचेही सांगितले. या जेतेपदाचा आनंद मोठा आहे, असेही त्याने आवर्जून सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने