'तिकीट महाग होतं म्हणून..', काँग्रेस सोडण्याच्या अफवेबद्दल आशीष देशमुखांचं स्पष्टीकरण

मुंबई: काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशीष देशमुख यांना पक्षातून तात्पुरतं निलंबित करण्यात आलंय. महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजी नगर येथील संयुक्त सभेला नाना पटोले अनुपस्थित होते. हे निमित्त साधून देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर कठोर टीका केली होती व त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.या निलंबनानंतर आशीष देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलंय. देशमुख म्हणाले, 'खोके, सुरत गुवाहाटी आणि छ. संभाजीनगर येथील सभेमध्ये प्रदेशाध्यक्षांची  गैरहजेरी होती, याबाबत मी बोललो होतो.



 ज्यादिवशी विधानसभेचे अध्यक्ष असताना नाना पटोले तडकाफडकी राजीनामा देतात, तेव्हा त्यांच्याबाबत मनात संशय आला. आणि हे षडयंत्र तेव्हापासून सुरु झालं. यासंदर्भात माझ्या उत्तरात याचं स्पष्टीकरण देणार आहे.'सध्या मी काँग्रेस पक्षातच आहे आणि राहीन. माझ्यावर पक्षातून काढून टाकण्याची कारवाई होऊ शकत नाही. त्यामुळं कोणत्याही पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर ते म्हणाले, शुक्रवार, शनिवार रविवार हा लाॅंग विकेंड आल्यामुळं मुंबई ते नागपूर विमानाच्या किंमती एकदम मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. या कारणामुळं मी पुण्याच्या मार्गानं नागपूरला पोहोचलो, असं त्यांनी स्पष्ट करत राष्ट्रवादीमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्ण विराम दिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने