आरटीई प्रवेशाला तांत्रिक अडचणीचा खोडा! शिक्षण विभागाकडून प्रवेशाला मिळणार कालावधी

मुंबई: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के जागांवर प्रवेश मिळावा, यासाठी राबविण्यात आलेल्या प्रवेशप्रक्रियेची निवडयादी १२ एप्रिलला जाहीर करण्यात आली.त्यामध्ये जिल्ह्यासाठी चार हजार ७५० बालकांची लॉटरी लागली. मात्र, आरटीई पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे १९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित झाला नाही. यावर विभागाने तांत्रिक अडचणी येत असल्याने प्रवेशासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगितले आहे. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शाळांमध्ये आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव असतात. नाशिकमधील ४०१ शाळांत प्रवेशासाठी चार हजार ८५४ जागा उपलब्ध असून, त्यासाठी तब्बल २२ हजार १२२ अर्जांची नोंदणी झाली आहे.

ही प्रक्रिया झाल्यानंतर राज्यस्तरावर ५ एप्रिलला सोडत प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये चार हजार ७५० बालकांची निवड झाली. १३ एप्रिलला आरटीईच्या पोर्टलवर निवडयादी प्रसिद्ध झाल्यानंतर पालकांना मेसेज येण्यास प्रारंभ झाला.बहुतांश पालकांना मेसेज प्राप्त झाला आहे. मात्र, आरटीई पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे अलॉटमेंट लेटर आणि हमीपत्र डाउनलोड करण्यास अडचण येत आहे. याशिवाय काहींना मेसेज प्राप्त झाले नसल्याने, पोर्टलवर खात्री करण्यासही तांत्रिक अडथळा निर्माण होत आहे.परिणामी, प्रवेश घेता येत नसल्याचे पालकांतून सांगितले जात आहे. त्यामुळे निवडयादी जाहीर झाल्याच्या दिवसापासून एकही प्रवेश निश्चित झाला नसल्याचे आरटीई पोर्टलवर दिसत आहे.



शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध प्रकटन

आरटीई अंतर्गत प्रवेशप्रक्रियेत सद्यःस्थितीत आरटीई २५ टक्के प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार येत असल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी याबाबत पालकांनी कोणतीही भीती/संभ्रम बाळगू नये, तसेच ज्या बालकांची प्रवेशासाठी सोडत (लॉटरी) द्वारे निवड झाली आहे, अशा बालकांना शाळा प्रवेशाकरिता पुरेसा कालावधी देण्यात येईल.

कागदपत्रांची पडताळणी सुरू

मोफत प्रवेशासाठी शाळा निश्चित करण्याची डेडलाइन २५ एप्रिल आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात कागदपत्रे पडताळणीला सुरवात करण्यात आली. कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर शिक्षण विभागामार्फत पालकांना कागदपत्रे पडताळणीची प्रत दिली जाते.ही प्रत निवड झालेल्या शाळेत दाखविल्यानंतरच मुलांचा प्रवेश निश्चित होतो. मात्र, आरटीई पोर्टलमध्ये तांत्रिक कारणांमुळे पालकांना अलॉटमेंट लेटर व पावती मिळण्यात अडचणी येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने