नथुराम गोडसेला शस्त्र पुरवण्यात सावरकरांचा सहभाग; माजी आमदाराचा गंभीर आरोप

सातारा : देशात हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत, हा द्विराष्ट्रवाद सावरकरांनी मांडून जातीभेद निर्माण केला. महात्मा गांधींच्या  खुनाच्या कटातही नथुराम गोडसेला शस्त्र पुरवण्यात सावरकर यांचा सहभाग असल्याचं उघड झाल्यानं त्यांना अटक झाली होती, असा आरोप माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केलाय.राष्ट्रद्रोही सावरकरांच्या ब्राह्मणी हिंदुत्वाचे विचार समाजात रुजविण्याचे काम सत्तापिपासू भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोप करत माजी आमदार माने  यांनी सावरकर यात्रांमध्ये छत्रपती घराणीही सहभागी होणं दुर्दैवी असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

दरम्यान, भाजपच्या या कृतीच्या निषेधार्थ शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय स्वक्लेश करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. माने म्हणाले, 'सावरकर यांच्या पत्रात माफीनामा असल्याने त्यांनी शरणागती मागितली होती. त्यामुळे सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक नसून राष्ट्रद्रोही आहेत, तरी देखील भाजप राज्यभरात सावरकर यात्रा काढत आहे.'इतिहासाची मोडतोड करून तो लोकांसमोर मांडण्याची परंपरा ब्राह्मणांची सुरू आहे. आपण सर्वजण या भूमीला मातृभूमी मानतो. मात्र, सावरकर पितृभूमी मानत होते. यावरूनच ते किती राष्ट्रद्रोही होते हे दिसून येते. सावरकर यांचा खोटा इतिहास लोकांपर्यंत येत असून, ते किती ढोंगी होते, हेही समाजाला माहिती पडणे आवश्‍यक आहे. देशभरात भाजपची सत्ता असल्याने सत्तेच्या नशेचा वापर करत सावरकर यात्रा काढून चुकीची मांडणी समाजासमोर आणली जात आहे, असंही माने म्हणाले.



गेल्या काही वर्षांत केवळ पैसा आणि दलाली सुरू असून, आरएसएसने (RSS) देशाचा तुरुंग केल्याचीही टीका त्यांनी केली. समाजाचे उद्दात्तीकरण करणाऱ्या सावरकरांचा निषेध करून समाजाने त्यांचे विचार आत्मसात केल्यास घातक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितलं. या वेळी भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. अशोक जाधव, चंद्रकांत खंडाईत आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांबद्दल चुकीचे लेखन

‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथात सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अस्लाघ्य लेखन केलं आहे. छत्रपती शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेचा केलेला सन्मान अत्यंत चुकीचा असून, महिलांबद्दल तिरस्कार करणारी भाषा वापरल्याचे लक्ष्मण माने यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने