कर्नाटक निवडणुकीत 'हा' बडा सुपरस्टार बदलणार भाजपचं 'नशीब'?

कर्नाटक: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या  प्रचारात कन्नड अभिनेता किच्चा सुदीप  उतरल्यामुळं विरोधी गटात खळबळ उडालीये.या सुपरस्टारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय. यासोबतच अभिनेता किच्चा सुदीपनं सांगितलं की, माझ्या संघर्षाच्या काळात बोम्मई पाठीशी उभी राहिले, त्यामुळं त्यांना पाठिंबा देणं हे माझं कर्तव्य समजतो. बसवराज बोम्मई  हे माझ्या मामासारखे आहेत, असंही त्यानं स्पष्ट केलं.





'किच्चा'चा भाजपला फायदा होणार?

  • किच्चा सुदीपच्या प्रवेशाचा भाजपला सर्वात मोठा फायदा म्हणजे, कर्नाटकात अभिनेत्याचे सर्वाधिक चाहते आहेत. त्याच्या निवडणूक प्रचारामुळं भाजपला सरकारनं केलेली विकासकामं लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळणार आहे.

  • किच्चा सुदीपचं भाजपच्या कॅम्पमध्ये सामील होणं ही मुळात एक धोरणात्मक चाल आहे. कारण, हा अभिनेता नायक समाजाचा आहे. राज्यात या समाजाची 7 टक्के लोकसंख्या आहे. अशा स्थितीत नायक समाजाची मतंही भाजपच्या गोटात पडणार आहेत.

  • नायक समाजातील तरुण पिढी आणि ज्येष्ठांना आपल्याकडं आकर्षित करण्याचा करिष्मा सुदीपकडं आहे, हे भाजपला चांगलंच ठाऊक आहे. हा नायक समुदाय बळ्ळारी, रायचूर, कोप्पळ, गदग आणि चित्रदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात आहे.

  • अभिनेते उमेदवारांचा प्रचार करतात. पण, पक्षात सामील होत नाहीत हा कर्नाटकात ट्रेंड आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत सुदीपनं मोलाकलमुरू विधानसभा मतदारसंघात श्रीरामुलूंसाठी प्रचार केला होता. किच्चा शिवमोग्गा जिल्ह्यातील आहे. त्याला तेथील लोकांचा प्रचंड पाठिंबा आहे.

किच्चाची फिल्मी कारकीर्द

दोन दशकांच्या कारकिर्दीत सुदीपनं कन्नड, हिंदी, तेलगू आणि तमिळ भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलंय. 'स्वाथी मुथु', 'केम्पे गौडा', 'ईगा' आणि 'पैलवान' यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी तो ओळखला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने