चीनच्या कुरापती वाढल्या; अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावं बदलली

बीजिंग : चीन भारताविरोधातील  डावपेच सोडत नाहीये. चीननं आता आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या 11 ठिकाणांची नावं बदलली आहेत.चीननं गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा असं केलंय. यापूर्वी 2021 मध्ये चीननं 15 आणि 2017 मध्ये 6 ठिकाणांची नावं बदलली होती. चीननं अरुणाचल प्रदेशला भारताचं राज्य म्हणून कधीही मान्यता दिलेली नाही. त्यांनी अरुणाचलचं वर्णन 'दक्षिण तिबेट'चा भाग म्हणून केलंय.

भारतानं तिबेटचा भूभाग जोडून अरुणाचल प्रदेश बनवल्याचा चीनचा आरोप आहे. चीननं एक नकाशाही जारी केलाय. यामध्ये अरुणाचल प्रदेशचा काही भाग दक्षिणेकडील तिबेट प्रदेशात दाखवण्यात आला आहे. त्यात अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर  जवळील शहराचाही समावेश आहे.चीनचं अधिकृत वृत्तपत्र 'ग्लोबल टाईम्स'नुसार, सोमवारी चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयानं 11 नावांच्या बदलाला मंजुरी दिलीये. हे सर्व क्षेत्र झेंगनान (चीनच्या दक्षिणेकडील शिनजियांग प्रांताचा भाग) अंतर्गत येतात. त्यापैकी 4 निवासी क्षेत्रं आहेत. यापैकी एक भाग अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरपासून अगदी जवळ आहे. 5 डोंगराळ भाग आणि दोन नद्या आहेत. चीननं या भागांना मंदारिन आणि तिबेटी भाषांमध्ये नावं दिली आहेत.



ग्लोबल टाइम्स हे चिनी कम्युनिस्ट पक्षाचं  मुखपत्र असलेल्या पीपल्स डेली ग्रुपचा भाग आहे. नावांची घोषणा करणं हे एक कायदेशीर पाऊल असून भौगोलिक नावांचं प्रमाणीकरण करणं हा चीनचा सार्वभौम अधिकार आहे, असं चिनी तज्ञांचं म्हणणं आहे. मंत्रालयानं जारी केलेली अरुणाचल प्रदेशसाठी प्रमाणित भौगोलिक नावांची ही तिसरी यादी आहे.अरुणाचलमधील सहा ठिकाणांच्या प्रमाणित नावांची पहिली यादी 2017 मध्ये जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर 15 ठिकाणांची दुसरी यादी 2021 मध्ये जाहीर करण्यात आली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं 3 मार्च 2023 रोजी 11 ठिकाणांची नावं बदलण्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, 2021 मध्ये भारतानंही चीनच्या अशाच हालचालींना चोख प्रत्युत्तर दिलं.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते, 'अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. नाव बदलल्यानं सत्य बदलत नाही. 2017 मध्येही चीननं असंच पाऊल उचललं होतं. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता आणि राहील.'तिबेटचे आध्यात्मिक धर्मगुरु दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यानंतर 2017 मध्ये चीननं नावांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यांच्या दौऱ्यावर चीननं जोरदार टीका केली होती. दलाई लामा यांनी अरुणाचल प्रदेशातील तवांगमार्गे तिबेटमधून पलायन केलं आणि 1950 मध्ये चीननं तिबेटवर लष्करी कब्जा केल्यानंतर 1959 मध्ये त्यांनी भारतात आश्रय घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने