Ashoka Piller याच व्यक्तींना आहे कारच्या नंबर प्लेटवर अशोक चिन्ह लावण्याचा अधिकार

दिल्ली: अशोक स्तंभ हे भारताचं राष्ट्रीय चिन्ह आहे. १९५० साली अशोक स्तंभाला भारताचं राष्ट्रीय चिन्ह म्हणून मान्यता मिळाली. पहिल्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी १०५०साली हे चिन्ह स्विकारण्यात आलं. सारनाथ येथील अशोक स्तंभावरून हे प्रतिक तयार करण्यात आलंय. मात्र मूळ अशोक स्तभ आणि भारताचं  बोधचिन्ह असलेल्या प्रतिकात थोडा फरक आहे.मूळ स्तंभात ४ दिशांना ३ सिंह कोरलेले आहेत. सिंहांखालच्या पट्टीवर पूर्वेकडे हत्ती, पश्चिमेकडे घोडा, दक्षिणेकडे बैल व उत्तरेकडे एक सिंह कोरला आहे. त्याखाली अशोकचक्र आहे. हे संपूर्ण शिल्प एका उलट्या कमळावर कोरण्यात आलं आहे. 

तर बोधचिन्ह म्हणून तयार करण्यात आलेल्या चिन्हातून कमळ वगळण्यात आलंय. या चिन्हावर तीन सिंह दिसत असून त्यातील एक समोरच्या बाजूला पाहणारा आहे. तर दोन डाव्या आणि उजव्या दिशेला पाहत आहेत. मध्यभागी अशोकचक्र आहे. अशोक चक्राशेजारी डाव्या बाजूस घोडा व उजव्या बाजूस बैल आहे. त्याखाली सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य देवनागरीत कोरण्यात आलंय. राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांच्या गाडीवर तुम्ही नंबरप्लेटच्या जागी अशोक चिन्ह पाहिलं असेल. तुम्हाला माहित आहे का अशोक चिन्ह कुणीही आपल्या कारवर लावू शकत नाही. 



भारताच्या या बोधचिन्हाचा वापर करण्याची परवानगी सर्वसाधारण कुणालाही नाही. केवळ काही शासकिय अधिकारी, उच्चधिकारी आणि ठराविक पद असलेल्यांनाच त्यांच्या गाडीवर अशोक चिन्हाचा वापर करण्याची परवानगी आहे. अधिकार नसताना या राष्ट्रीय चिन्हाचा वापर केल्यास दंडात्मक किंवा फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. केंद्र सरकारने २००५ साली लागू केलेल्या कायद्यात काही बदल करत २००७ साली नवी अधिसूचना जारी केली. ज्यात राष्ट्रीय चिन्हाच्या वापरातील नियमावलीच काही बदल करण्यात आले. तर या चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार कुणाला आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

या व्यक्तींना गाडीवर नंबर प्लेट एवजी अशोक चिन्ह वापरण्याची परवानगी

१. राष्ट्रपती भवनमधील गाड्यावर अशोक चिन्ह वापरण्याची परवानगी आहे.

  • यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती पदासमान असलेले अतर उच्चधिकारी

  • इतर देशातील अतिउच्चपदस्थ विदेशी अधिकारी, इतर देशातील काही प्रमुख पाहूणे, इतर देशातील राजकुमार किंवा राजकुमारी किंवा त्यांच्या समान असलेले इतर अधिकारी.

  • या शिवाय राष्ट्रपती दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीमागे चालणाऱ्या इतर कार.

  • राज्याचे राज्यपाल, संघ राज्य क्षेत्राचे उपराज्यपाल

  • इतर देशात भारताच्या राजनैतिक मिशनमध्ये सहभागी असलेले प्रमुख हे त्या देशात ते वापरत असलेल्या गाडीवर भारताचं राष्ट्र चिन्ह वापरू शकता.

  • परदेशात भारताच्या काउन्सिल पदावर असलेले अधिकारीदेखील त्यांच्या गाडीवर या चिन्हाचा वापर करू शकतात. 

  • भारतातील परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी भारतात एखाद्या सोहळ्यासाठी आल्यास किंवा विदेशी पाहूण्यांसह आल्यास त्यांना हे चिन्ह वापरण्याचा अधिकार आहे. 

या गाड्यांमधून केवळ अधिकार असलेल्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या पती अथवा पत्नीला प्रवास करण्याची परवानगी असते. 

याशिवाय काही पदाधिकाऱ्यांना केवळ त्यांच्या राज्यातच बोधचिन्ह असलेली गाडी वापरण्याची परवानगी आहे. 

  • यात भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश 

  • राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राज्य मंत्री

  • विधान सभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष

  • राज्य विधान सभेचे सभापति आणि उप सभापति

या यादीवरून  गाडीवर अशोक चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार हा केवळ काही महत्वाच्या व्यक्तींनाच आहे हे लक्षात येतं. तर कागदावरही म्हणजेच एखाद्या लेटरहेड किंवा कार्डवरही या चिन्हाचा कुणीही वापर करू शकत  नाही. केवळ सरकारनं प्रकाशित केलेल्या कागदपत्रांवरच या बोधचिन्हाचा वापर होतो. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने