बाजार समिती अर्ज भरण्यासाठी झुंबड

कोल्हापूर:  कोल्हापूर, येथील कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी प्रचंड झुंबड उडाली. आज तब्बल ४६८ जणांनी आपली उमेदवारी अर्ज भरले. काही उमेदवारांनी केलेले शक्तिप्रदर्शन व उमेदवारांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांमुळे बाजार समिती निवडणूक कार्यालय गर्दीने गजबजून गेले. उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी (ता. ५) तर या निवडणुकीसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होत आहे.शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तब्बल तीन वर्षांनी होत आहे. शेतकऱ्यांना थेट उमेदवारी अर्ज भरण्यास शासनाने मान्यता दिली, त्यामुळे सुरुवातीपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठा प्रतिसाद लाभला. काँग्रेस वगळता अन्य राजकीय पक्षांच्या पातळीवर बाजार समितीच्या निवडणुकीबाबत आज शेवटच्या दिवसापर्यंत संभ्रम कायम होता.



निवडणुकीत ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, त्यातील आपल्या पक्षाला सुसंगत असे उमेदवार आपल्या कवेत घेण्यासाठी या राजकीय नेत्यांचे प्रयत्न सुरू होतील. पॅनेल बांधणीबाबत चर्चा सुरू होईल. यात काँग्रेसचे पॅनेल तूर्त तयार आहे, असे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, जनसुराज्य व शेकाप यांच्या पातळीवर निर्णय काय होतो, याबाबत उत्सुकता कायम आहे.या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा संस्था, व्यापारी अडते व माथाडी कामगार यांचे पदाधिकारी सभासद तसेच शेतकरी यांचे मतदान ग्राह्य मानले जाते. तसेच उमेदवारीही याच पाच गटातून आहे. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर ७९३ अर्ज दाखल झाले.त्यात विकास सोसायटी गटातून ३३१, ग्रामपंचायत गटातून १४९, अनुसुचित जाती गटातून ४२, अडते व्यापारी गटातून २९ अर्ज, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातून ३८ अर्ज, तर माथाडी कामगार गटातून १६, महिला प्रतिनिधी गटातून ६२,इतर मागासवर्गीय गटातून ९६, विमुक्त जाती गटातून ३० अर्ज दाखल झाले आहेत.

प्रचारासाठी मोजकेच दिवस

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. यात ७९३ जणांची उमेदवारी आहे, यातील काही अर्ज उडण्याची शक्यता आहे. २० ते २६ एप्रिल असे प्रचारासाठी अवघे सहा दिवस उरणार आहेत. याच कालावधीमध्ये प्रचार करावा लागणार आहे. त्यानंतर २८ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचणे व आपली भूमिका मांडणे यासाठी उमेदवारांना कसरतच करावी लागेल, असे चित्र दिसते.

आज अर्ज भरलेले प्रमुख

माजी सभापदी बाबगोंडा पाटील, नंदकुमार वळंजू, उत्तम कांबळे, शशिकांत आडनाईक, मानसिंग पाटील, अभिषेक अरूण डोंगळे, ‘गोकुळ’चे माजी संचालक पी. डी. धुंदरे, सचिन घोरपडे, सज्जन पाटील आदी प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल केले. श्री. वळंजू यांनी मोटारसायकल रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला.

गडहिंग्लजला एकूण २१७ अर्ज दाखल

गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला. आज एकाच दिवशी १४० अर्ज दाखल झाले. तर एकूण उमेदवारी अर्जांची संख्या २१७ झाली आहे.विविध राजकीय पक्ष-गटांच्या नेत्यांसह इच्छूक उमेदवार व समर्थकांच्या गर्दीने सहायक निबंधक कार्यालयाचा आवार फुलून गेला होता. तर जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ११५ अर्ज दाखल झाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने