तैवानच्या मुद्द्यावरून युरोपमध्ये अस्वस्थता

पॅरिस : युरोपने अमेरिकेच्या मागे स्वत:ची फरफट करून घेऊ नये, असे विधान फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केल्यानंतर पाश्‍चिमात्य राजकारणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. मॅक्रॉन यांच्या विधानावर अमेरिकेने टीका केली असून युरोपची साथ सोडण्याचा इशारा दिला आहे. या सर्व प्रकरणामुळे युरोपमध्ये सध्या राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन हे दोन आठवड्यांपूर्वी चीनच्या दौऱ्यावर गेले होते. तेथे चीन आणि फ्रान्सदरम्यान विविध महत्त्वाचे करार झाले. तेथून परतताना विमानातच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी, ‘तैवानचा मुद्दा ही काही युरोपची समस्या नाही.

हे अमेरिका आणि चीनचे भांडण असून युरोपने त्यापासून लांब राहण्याची गरज आहे,’ असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर अमेरिकेतील खासदारांनी टीका केली होती. ‘मॅक्रॉन हे जर संपूर्ण युरोपच्या वतीने बोलत असतील, तर अमेरिकेने केवळ चीनला रोखण्यावरच लक्ष द्यावे आणि युक्रेनमधील युद्ध युरोपला हाताळू द्यावे,’ अशी टिपणी एका खासदाराने सोशल मीडियावर केली होती.‘वॉल स्ट्रिट जर्नल’मध्येही मॅक्रॉन यांच्या भूमिकेवर टीका करणारे लेख प्रसिद्ध झाले होते. मॅक्रॉन यांच्या भूमिकेमुळे चीनला रोखण्यासाठी अमेरिका आणि जपान करत असलेल्या प्रयत्नांना हरताळ फासला जाऊ शकतो, असे या लेखात म्हटले होते. फ्रान्सला चीनकडून मोठी गुंतवणूक मिळणार असल्यानेच मॅक्रॉन यांनी हा स्वार्थी विचार केला असल्याचीही टीका होत आहे.



व्यापारावरही परिणाम शक्य

जगातील सेमिकंडक्टर चिप उत्पादनापैकी ९० टक्के उत्पादन तैवानमध्ये होते. जगाच्या तंत्रज्ञान पुरवठा साखळीत तैवान हा महत्त्वाचा दुवा आहे. तैवानमध्ये उत्पादित होणाऱ्या सेमिकंडक्टर चिपचे बाजारातील मूल्य शंभर अब्ज डॉलरहून अधिक आहे. चीनने या प्रदेशाचा ताबा मिळविल्यास या पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी पाश्‍चिमात्य देशांना चिंता आहे.जगभरात इतरत्र सेमिकंडक्टर उत्पादनाचे जाळे निर्माण करण्यास अनेक वर्षे लागतील आणि चीनचा तैवानमधील कंपन्यांवर ताबा आल्यास युरोप, अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया आणि इतर देशांमधील महत्त्वाच्या उद्योगांवरही चीनचाच वरचष्मा राहिल, अशी चिंता या देशांना भेडसावत आहे.

चीनच्या युद्धसरावामुळे चिंता

चीनने आठ ते दहा एप्रिल या काळात तैवानभोवती मोठा युद्धसराव सुरु करून पाश्‍चिमात्य देशांना चिंतेत टाकले आहे. चीनपासून वेगळे राहण्याच्या तैवानच्या हक्काला मिळालेले हे आव्हान असल्याचे मत या देशांनी व्यक्त केले होते. स्वातंत्र्य आणि इतर मूल्यांचे रक्षण करण्यास अमेरिका आणि तिचे युरोपमधील मित्रदेश कटिबद्ध असल्याचे या गटाचे म्हणणे असते.त्यामुळे तैवान आणि युक्रेनसाठी सर्वांनी मिळून लढा देणे गरजेचे आहे, अशी त्यांची भूमिका आहे. युक्रेनचा पराभव झाल्यास तो लोकशाहीला मोठा धक्का असेल. यामुळे जगामध्ये अस्थिरता निर्माण होईल, असे पाश्‍चिमात्य देशांचे मत आहे. तैवानबाबतही त्यांची हीच भूमिका आहे. त्यामुळे मॅक्रॉन यांनी मांडलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे युरोपमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने