दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीचा निर्णय घातक

मुंबई - केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थ आयात करण्यासंदर्भात घेतलेला निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी घातक असून राज्यातील दूध व्यवसायाला याचा मोठा फटका बसेल. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यासंदर्भात केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना पत्रही पाठवले असून तसे ट्विट केले आहे.



केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाचा लोणी आणि तूप यासारखे दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचा हेतू आहे. यासंदर्भात केंद्राचा कोणताही निर्णय पूर्णपणे अस्वीकार्य असेल,असे पवारांनी या पत्रात म्हटले आहे. या उत्पादनांच्या आयातीचा देशातील दूध उत्पादकांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होईल. दूध उत्पादक शेतकरी अलिकडेच कोविड संकटातून बाहेर आले आहेत. त्यात असा निर्णय घेतल्यास दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेवर गंभीर अडथळा निर्माण होईल,अशी भीती पवार यांनी पत्रात नमूद केली आहे. या प्रकरणाकडे लक्ष दिल्यास आणि मंत्रालयाने दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याच्या कोणताही निर्णय घेण्यापासून परावृत्त केल्यास मला आनंद होईल, असेही पवारांनी पत्रात म्हटले आहे.

तफावतीवर सरकारचे लक्ष

नवी दिल्ली : राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाबरोबरच केंद्र सरकारही डेअरी उत्पादनांच्या मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावतीवर लक्ष ठेवून आहे, असे सरकारतर्फे आज सांगण्यात आले. तसेच, परिस्थितीनुसार आयातीबाबतचा निर्णय घेण्यात येईल,असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ‘डेअरी क्षेत्रात मागणी आणि पुरवठ्यात काही तफावत आहे. कोरोना काळानंतर अधिक पोषक आणि सुरक्षित दुधाची आणि संबंधित उत्पादनांची मागणी वाढल्याने ही तफावत आहे,’ असे मत्स्य, पशु संवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाने सांगितले.माध्यमांमध्ये आलेल्या माहितीच्या आधारे शरद पवार यांनी ट्विट करण्याऐवजी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्र्यांकडून किंवा सचिवांकडून माहिती घ्यायला हवी होती. लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यात दुधाचे संकलन घटले आहे. मात्र, महाराष्ट्रात फारसा फरक पडलेला नाही. महाराष्ट्रातील घराघरांत तूप बनविले जाते. अन्य राज्यांच्या तुलनेत लोणी जास्त खाल्ले जात नाही. त्यामुळे महाराष्ट्रावर या निर्णयाचा फारसा परिणाम होणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने