लोकोत्‍सव... आई अंबेचा...

कोल्हापूर- ‘अंबामाता की जय’चा अखंड गजर, फुलांच्या पायघड्या, पारंपरिक वाद्यांचा थाट, नयनरम्य आतषबाजी, सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या आणि आकर्षक विद्युतरोषणाईच्या साक्षीने आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव सोहळा सजला. कोल्‍हापूरचा लाेकोत्‍सव ठरलेला हा सोहळा अनुभवण्यासाठी सारे शहर रथोत्सव मार्गावर एकवटले.देवस्थान समितीने साकारलेल्या नवीन सागवानी रथातून हा सोहळा सजला. या रथावरील चांदीचे नक्षीकाम अद्यापही पूर्ण झाले नसले तरी आकर्षक रोषणाईने एकूणच चंदेरी झगमगाट अनुभवायला मिळाला.लोकोत्‍सव... आई अंबेचा...

दिवशी श्री अंबाबाईचा रथोत्सव होतो. गेल्या काही वर्षांत हा सोहळा म्हणजे कोल्हापूरकरांचा लोकोत्सवच बनला आहे. साहजिकच सायंकाळी सातपासूनच कोल्हापूरकरांची पावलं मंदिराकडे वळली. रात्री साडेआठच्या सुमारास उत्सवमूर्ती रथामध्ये विराजमान झाली.त्यानंतर आरती झाली आणि तोफेची सलामी दिल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला. पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, व्यवस्थापक महादेव दिंडे आदींच्या उपस्थितीत रथोत्सवाला प्रारंभ झाला.महाद्वार, गुजरी आणि भवानी मंडपादरम्यान देवीचे दर्शन घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. फुलांच्या वर्षावात भाविकांनी देवीचे स्वागत केले. बिनखांबी गणेश मंदिरमार्गे रथ पुन्हा मंदिरात आल्यानंतर या सोहळ्याची सांगता झाली.



प्रबोधनात्मक रांगोळ्या अन् शिवकाळही अवतरला...

न्यू गुजरी मित्र मंडळातर्फे रथोत्सव मार्गावर आकर्षक रांगोळ्या व फुलांच्या पायघड्यांचा आविष्कार सजला. व्हाईट मेटल लाईटसने परिसर उजळून निघाला होता. ‘लेक वाचवा’, ‘पर्यावरण वाचवा’ असे विविध संदेशही या आविष्कारातून दिले गेले.न्यू गुजरी मित्र मंडळ, श्री महालक्ष्मी अन्नछत्रातर्फे प्रसादाचे वाटप झाले. बालगोपाल तालीम परिसरात महालक्ष्मी ढोलताशा पथकाने सादरीकरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांवरील देखावा साकारून येथे शिवकाळ अवतरला गेला.

शिवछत्रपती, ताराराणींचा आज रथोत्सव

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिवछत्रपती व महाराणी ताराराणी यांच्या स्मृती चिंरतन जपण्याबरोबरच नव्या पिढीला त्यांच्या शौर्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने जोतिबाच्या चैत्र यात्रेनंतर येथे शिवाजी महाराज व ताराराणींच्या रथोत्सवाची सुरुवात केली.पारंपरिक वाद्यांच्या गजरात हा सोहळा उद्या (शुक्रवारी) रात्री नऊला होणार असून शहरातील महिला बचत गटांसह नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने