उमेदवारीवरून देवेगौडा कुटुंबात मतभेद

कर्नाटक: एच. डी. रेवण्णा यांच्या पत्नी भवानी यांच्या हसन मतदारसंघातील उमेदवारीवरून माजी पंतप्रधान व धजदचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांच्या कुटुंबात तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत.रेवण्णा यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी देण्याचा आग्रह धरला आहे, तर माजी मुख्यमंत्री कुमाारस्वामी यांनी त्याला विरोध केला आहे. दोन्ही बंधूमध्ये निर्माण झालेले मतभेद मिटविण्यासाठी देवेगौडा यांनी मध्यस्थी केली, परंतु त्यात त्यानाही यश आले नाही. 



देवेगौडा यांनी त्यांच्या पद्मनाभनगर येथील निवासस्थानी कुमारस्वामी, रेवण्णा आणि भवानी यांच्यासोबत दोन तासांपेक्षा जास्त वेळ चर्चा केली. त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा पक्षाचे हीत आणि कौटुंबिक ऐक्य अधिक महत्त्वाचे आहे. गौडा यांनी कुमारस्वामी यांच्याशी सहमती दर्शवली की हसनची जागा पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी सोडली पाहिजे आणि भवानी यांनी यावेळी उमेदवारीचा आग्रह धरू नये.त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना विधानपरिषद सदस्य (एमएलसी) बनवण्याची ऑफरही दिली. मात्र ही ऑफर नाकारत, रेवण्णा आणि भवानी या दोघांनीही उमेदवारीचा आग्रह धरला.

या मुद्द्यावर दोन भावांमध्ये जाहीर भांडण झाले. कुमारस्वामी यांनी माजी धजद आमदार एस. प्रकाश यांचा मुलगा एच. पी. स्वरूप यांना हसनमधून उमेदवारी दिली कारण त्यांची प्रतिमा चांगली आहे. गौडा यांनी कुमारस्वामी यांच्या भूमिकेचे समर्थन केल्याने भवानी आणि रेवण्णा गोंधळातच बैठक सोडून निघून गेले.गौडा यांची मध्यस्थी हा तोडगा काढण्याची शेवटची आशा होती. आता, कुमारस्वामी यांच्या आदेशाला झुगारून भवानी अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरणार का, हे पाहावे लागणार आहे. कारण रेवण्णा यांचाच हसन जिल्ह्यात बऱ्यापैकी प्रभाव आहे. मार्चच्या मध्यात भवानी यांनी हसन शहरातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

पत्नी राजकारणात येणार नाही : कुमारस्वामी

‘हा सनचे राजकारण वेगळे असून माझ्या पत्नीचे राजकारण वेगळे आहे,’ असे मत धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी मांडले. अनिता कुमारस्वामी यांनी आपल्याला पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरवावे यासाठी पतीकडे हट्ट धरल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या,कुमारस्वामी यांनी त्याचे खंडन केले आहे. याआधी आम्हाला संबंधित मतदारसंघामध्ये चांगला उमेदवार मिळत नव्हता त्यामुळे अनिता हिने निवडणूक लढण्याची तयारी केली होती. प्रत्यक्षात तिला राजकारणामध्ये रस नसून यापासून दूर राहण्यालाच तिचे प्राधान्य आहे, असे कुमारस्वामी यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने