‘इझी मनी’मुळे बँकिंगमध्ये पेच; रघुराम राजन

ग्लासगो : सिलिकॉन व्हॅली बँक व क्रेडिट स्यूसे यातील गोंधळानंतर अजूनही जागतिक बँकिंग व्यवस्थेमध्ये पेचप्रसंग उद्भवण्याची शक्यता असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी मुख्यअर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे.गेली जवळपास दहा वर्षे विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून अर्थव्यवस्थांना ‘इझी मनी’ची चटक लावण्यात आली आणि नंतर धोरणकर्त्यांनी नाड्या आवळण्यास सुरुवात केल्यानंतर आता बँकिंग अर्थव्यवस्थांची स्थिती नाजूक व्हायला लागली आहे, असेही त्यांनी सांगितले. मुख्यत: अमेरिकेतील सन २००८ च्या सबप्राईम गोंधळाची पूर्वइशारा राजन यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यअर्थतज्ज्ञ असताना २००५ मध्येच दिला होता.



मात्र अमेरिकेच्या तेव्हाच्या अर्थमंत्र्यांनी त्यांचा इशारा धुडकावून लावताना त्यांचा उल्लेख विकासविरोधी असा केला होता.‘‘यापुढेही चांगले घडावे अशी माझी अपेक्षा आहे. मात्र यापुढेही बँकिंग व्यवस्थांमध्ये काही पेचप्रसंग समोर येऊ शकतात. कारण जे आपल्या कधी कल्पनेतही आले नव्हते ते घडल्याचे नुकतेच आपल्याला पाहावे लागले, असेही त्यांनी ग्लासगो येथे दिलेल्या एका मुलाखतीत दाखवून दिले.गेली अनेक वर्ष सर्वांना मुबलक निधी पुरवठा झाल्याने सर्वांना इझी मनी मिळत गेली. त्याची एवढी सवय झाली की हा इझीमनीचा पुरवठा बंद झाल्यानंतर हा सारा डोलाराच डळमळीत झाला,’’ असे ते म्हणाले. रघुराम राजन हे सध्या युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेस चे प्राध्यापक आहेत.

आपापल्या कुवतीनुसार उपाय

‘‘या अशा आर्थिक धोरणांचे परिणाम फारच मोठे आहेत आणि त्यावर साध्यासुध्या उपायाने मात करता येणार नाही हे लक्षात आले नाही. मध्यवर्ती बँकांनी बँकांच्या अर्थव्यवस्थेत इझीमनी आणल्यामुळे त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी बँकांनी आपापल्या कुवतीनुसार उपाय योजले. मात्र नंतर मध्यवर्ती बँकांनी कठोर नियंत्रण आणल्यावर या बँकांची अवस्था नाजूक बनली आहे,’’ असेही रघुराम राजन यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने