वैद्यनाथ कारखान्यावर छापा पडल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या स्व. गोपीनाथ मुंडेंना...

परळी: भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर GST विभागाचा छापा पडला आहे. आज सकाळी १० वाजता GST चे अधिकारी पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात पोहोचले. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील आर्थिक व्यवहारांची अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केलीय.या कारवाईनंतर माध्यमांशी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, वैद्यनाथ कारखाना मागील अनेक दिवसांपासून बंद असून त्याला कुलूप लावलेलं आहे. कारखाना अत्यंत आर्थिक अडचणीत आहे. २०११ पासून कारखान्यातील सातत्याने झालेलं कमी उत्पादन, २०१३-१५ अशा तीन वर्षातील प्रचंड दुष्काळ, उसाचा अभाव आणि अधिकचं कर्ज या कारणांमुळे कारखाना अडचणीत असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.



पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ कारखान्याने १२ कोटींचा जीएसटी चुकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे कारखान्याची मालमत्ता जप्त होऊ शकते. पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील सुप्त कलह लपलेला नाही. काही दिवसांपूर्वी नाशिक येथे स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा अनावरण कार्यक्रमाला फडणवीसांना निमंत्रण नव्हतं. त्यामुळे वैद्यनाथ कारखान्यावर झालेल्या कारवाईविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहेत.


नेमका तपास कसला सुरुय हे माहिती नाही- पंकजा मुंडे

जीएसटीच्या छाप्यानंतर बोलतांना पंकजा मुंडे यांनी तपासाबाबत माहिती नसल्याचं म्हटलं आहे. त्या म्हणाल्या की, स्व. गोपीनाथ मुंडेंनाही तेव्हा राजकारणामुळे कर्ज मिळालं नव्हतं. त्यामुळे राष्ट्रीय बँकांकडून अधिकच्या व्याजाने कर्ज घ्यावं लागलं. सद्य घडीला कारखान्यात कोणीच काम करत नाही, त्यामुळे मी स्वत: कुलूप उघडून अधिकाऱ्यांना कागदपत्रे दिली आहेत. सुरु असलेली तपासणी नेमकी कसली आहे, हे माहिती नसल्याचं पंकजा म्हणाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने