आंबेडकरांनी आत्मचरित्र का लिहिलं नाही? निवृत्तीनंतर ते काय करणार होते?

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ग्रंथांच्या सागरात नेहमी समाधिस्त राहणारा ज्ञानीयांचा राजा. संविधानकर्त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ग्रंथ लिहिले, अर्थविषयक पेपर मांडले. भावी पिढ्यांना मार्गदर्शन करणारी दिशा मांडली पण त्यांनी कधी आपले आत्मचरित्र लिहिले नाही. अपवाद Waiting for a Visa या पुस्तकाचा. 1935–36 साली लिहिलेय या २० पानाच्या छोट्याशा पुस्तिकेमध्ये बाबासाहेबांनी आपल्या काही आठवणी सांगितल्या आहेत. पण त्यांचे अधिकृत आत्मचरित्र नाही. याचं कारण त्यांनी एके ठिकाणी सांगितलं आहे.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जगातील सहावे विद्वान. डोळ्यांत ज्ञानाचं प्रखर तेच आणि चेहऱ्यावर विलक्षण गांभीर्य. चेहऱ्यावर गांभीर्य राहणार नाही तर काय?.



या देशातल्या समाजव्यवस्थेनं दुःखाचं बलुतं त्यांच्या पदरात टाकल्यामुळे शोषितांचे दुःख दूर करण्याची अहर्निश चिंता त्यांच्या मनाला लागली होती. म्हणूनच त्यांच्या चेहऱ्यावर हास्याची फुले कचित उमलली. भरल्यापोटी रसिक असणं आणि त्या रसिकतेची टिमकी वाजवणं वेगळं आणि दुःख पचवून रात्रंदिन युध्दाच्या प्रसंगाला सामोरं जाऊन जीवनाकडं अत्यंत रसिकतेने पाहाणं वेगळं. हजारो वर्षांच्या अन्यायाच्या जातीअंताची धीरगंभीर लढाई लढताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा मूळचा मिश्किल व रसिक स्वभाव शाबूत ठेवला होता. याचं उदाहरण त्यांच्या एका मुलाखतीमधून मिळतं.  ही मुलाखत श्री. ह. वि. देसाई यांनी घेतलेली होती. ती त्याच्या "मोठ्यांच्या मुलाखती" या ऑक्टोबर १९४० मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात २०-२८ मध्ये पानावर दिलेली आहे.

या मुलाखती दरम्यान बाबासाहेबांना अनेक हलकेफुलके प्रश्न विचारण्यात आले . यातला एक प्रश्न होता की "आपणांस संगीत आवडतं का?"त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले संगीत आणि हास्य प्रत्येक माणसाला आवडलं पाहिजे. संगीतामुळे जीवनात नवजीवन निर्माण होतं तसंच हास्यानंही माणसाला पोटभर हसता आलं पाहिजे. आमच्या हिंदी लोकांना शत्रू निर्माण करता येतात पण हसता मात्र येत नाही. हास्य हे प्रभावी शस्त्र आहे. उपहासपूर्वक हसूनही शत्रूची रेवडी उडविता येते. त्याला नामोहरम करता येते. आणि म्हणूनच दुसऱ्याकडे पाहून हसणं आणि स्वताही पोट धरून हसणं मला फार आवडतं. "

मुलाखतकर्त्याने पुढचा प्रश्न विचारला, " आपणास राजकारण फार आवडत असेल नाही?" डॉ. बाबासाहेब आंबेडकर तेव्हा ठाम पणे म्हणाले, "नाही मुळीच नाही! Politics is the one thing that hate! सगळ्यात कुठल्या गोष्टीचा जर मला तिटकारा असेल तर तो राजकारणांचा"

या उत्तरामुळे आश्चर्यचकित झाल्यामुळे त्यांना विचारण्यात आलं की  "आपण राजकारणातून निवृत्त झालात तर कोणतं आवडीचं काम हाती घ्याल?"यावर बाबासाहेब आनंदाने म्हणाले , " would do literary work! लेखनात सारा वेळ मी खर्च करीन. माझ्या दृष्टीकोनान बुद्धाच्या चरित्रावर मी एक ग्रंथ लिहिणार आहे आणि एक स्वतंत्र कादंबरी लिहिणार आहे" बाबासाहेबांनी अफाट लिखाण केलं आहे. त्यांना लेखनाची आवड देखील होती मात्र तरीही त्यांनी कधी आपले आत्मचरित्र कधी लिहिलं नाही. हाच प्रश्न त्यांना मुलाखती दरम्यान विचारण्यात आला.   

"आपण आत्मचरित्र का लिहीत नाही ?"

लिहिण्यासारखं काही नाही म्हणून!" डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हसत हसत उत्तरं दिलं. ह. वि. देसाई  आपल्या पुस्तकात म्हणतात, "मी आणि माझ्या मित्राने डॉक्टरांचा निरोप घेतला. डॉक्टरांची राजकीय मते काहिही असोत पण व्यासंगी विद्वान या नात्याने मात्र डॉक्टर सर्वांना आदर्श आहेत, आणि म्हणूनच डॉक्टरांविषयी मला नेहमी आदर वाटतो. आपलेपणा वाटतो.'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने