खुद्द शरद पवारांनीच सांगितलंय राष्ट्रवादीचा कोणताही नेता भाजपात..; NCP च्या बड्या नेत्याचा दावा

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणीही कुठं जाणार नाही, तसंच कोणीही फुटणार नाही, असं खुद्द शरद पवारांनी सांगितलंय. त्यामुळं राष्ट्रवादीतील कोणीही भाजपमध्ये जाणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं.शिंदे गटाचे 16 आमदार शंभर टक्के अपात्र होणार आणि त्यामुळं सरकार बरखास्त होणार आहे, असा दावाही त्यांनी केला. आमदार शिंदेंनी आज साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला.



शिंदे म्हणाले, ‘‘शरद पवार  यांनी स्पष्टपणे सांगितले, की राष्ट्रवादीतील कोणीही फुटणार नाही. शिंदे गटाचे 16 आमदार शंभर टक्के अपात्र होणार आहेत. शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त होणार आहे. आता सरकार अस्थिर होणार असल्याने हे येणार ते येणार अशा वावड्या उठत असतात. लोकशाहीच्या माध्यमातून तुमच्यात दम असेल तर लगेच निवडणुका जाहीर करा; पण ते करू शकत नाहीत. कारण त्यांना विश्वास नाही.''

त्यांच्या दिल्लीतील यंत्रणेलाही त्यांचे दहा ते बाराच्यावर खासदार निवडून येणार नाहीत अशी माहिती मिळालेली आहे. राष्ट्रपती राजवट लागू करायची तर सहा महिने आधी करावी लागते. लोकसभेची मुदत संपण्यास अजून एक वर्ष, तर विधानसभेला दीड वर्षे कालावधी आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करता येत नाही. त्यामुळेच त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.महेश शिंदेंनी दिलेल्या आसरानीच्या उपमेवर आमदार शिंदे म्हणाले, ‘‘एखाद्याला स्वतःची भीती वाटायला लागते. तेव्हा तो कलाकारांची नावे घेतो. त्यांच्या दृष्टीने मी आसरानी असलो तरी ते गब्बरसिंग आहेत. गब्बरसिंग गाव लुटायला यायचा हा तर जिल्हाच लुटायचा प्रयत्न करतोय. मस्ती आणि हुकूमशाही फार काळ चालत नाही.’’

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने