'या' वकिल बाप-लेकीची जोडी राहुल गांधींना मिळवून देणार खासदारकी; वकिलांनी नाकारली होती मोठी ऑफर

दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरतच्या सत्र न्यायालयात सुनावण्यात आलेल्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी सुरतच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाने राहुल गांधी यांना फौजदारी अवमान प्रकरणी दोषी ठरवत दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. 'मोदी आडनावा'बाबत केलेल्या वक्तव्यामुळे राहुल गांधी यांना शिक्षा सुनावण्यात आली होती.सुरत येथील सत्र न्यायालयात राहुल गांधी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आर. एस. चीमा, तरन्नुम चीमा आणि किरीट पानवाल हे वकील बाजू मांडणार आहेत. बार अँड बेंचने दिलेल्या वृत्तानुसार, ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी धोरणात्मक सल्लागार म्हणून या टीमला मदत करत आहेत.



राहुल गांधी यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांचे नेतृत्व करणारे आर. एस. चीमा यांची गणना देशातील अव्वल फौजदारी वकिलांमध्ये होते. पंजाब आणि दिल्लीत प्रॅक्टिस करणारे चीमा १९७७ पासून वकील आहेत आणि त्यांनी कोलगेट घोटाळ्यापासून ते शीख दंगलीपर्यंतचे खटले लढले आहेत. चीमा यांनी सीबीआयसाठी अनेक हायप्रोफाईल खटलेही लढवले आहेत.दिल्ली उच्च न्यायालयात सीबीआयच्या वतीने विशेष सरकारी वकील (एसपीपी) म्हणून आरएस चीमा यांनी हजर राहून सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता रद्द केली. प्रसिद्ध कोलगेट घोटाळ्यातील अनेक आरोपींना त्यांनी शिक्षेपर्यंत पोहोचवले.

आर. एस. चीमा हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. याशिवाय ते पंजाब सरकारचे अॅडव्होकेट जनरल (एजी) देखील होते. त्यांनी २ वर्षे या पदावर काम केले. चीमा यांना न्यायाधीश होण्याची ऑफरही देण्यात आली होती, पण त्यांनी ती ऑफर नाकारली होती.आर. एस. चीमा हे राहुल गांधींवर खटला चालवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या बाजुने खटला लढवला होता आणि भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांची उलटतपासणी केली होती. स्वामी हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत.

राहुल गांधी यांची दुसरी वकील आर. एस. चीमा यांची मुलगी तरन्नुम चीमा आहे. फौजदारी खटल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या तरन्नुम गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ वकिली करत आहेत. आरएस चीमा आणि तरन्नुम चीमा ही बाप-लेकीची जोडी टू जी ट्रायलमध्ये डिफेन्स टीमचा भाग होती. तरन्नुम चीमा यांनी १९८४ च्या शीखविरोधी दंगली आणि कोलगेट प्रकरणात वडिलांना मदत केली होती. तरन्नुम चीमा यांनी सर्व नेत्यांच्या पीएमएलएशी संबंधित खटलेही लढवले आहेत.राहुल गांधी यांचे तिसरे वकील किरीट पानवाल आहेत. पानवाल हे चार दशकांहून अधिक काळ वकील आहेत आणि सुरतमधील प्रसिद्ध फौजदारी वकिलांमध्ये त्यांची गणना केली जाते. किरीट पानवाल यांनी आतापर्यंत खुनाशी संबंधित १६०० खटले लढवले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने