शिवकुमारांचा बालेकिल्ला अभेद्य राहणार ?

कनकपुरा: (सामान्य) हा कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यातील आणि बंगळूर प्रदेशातील महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ. बंगळूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचा एक भाग. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि भावी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार डी. के. शिवकुमार यांचा हा बालेकिल्ला.तीन विधानसभा निवडणुकीत त्यांनी या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळिविला. आता चौथ्यावेळीही याच मतदारसंघातून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांचा विजय निश्चित मानला जातो. परंतु अडचणींचा सापळा रचून त्यांना कोंडीत पकडण्याचा डाव सत्ताधारी भाजपने रचला आहे. त्यांच्या विरुध्द खटले दाखल करून पेच निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातून सहीसलामत पार पडण्याची हिंमत आजवर त्यांनी दाखविली आहे.

- बी. बी. देसाई

धनदांडगे व कुशल संघटक म्हणून राजकीय क्षेत्रात शिवकुमार यांची ओळख आहे. राज्यातील कॉंग्रेसच्या संघटनेत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांना कायदेशीर अडचणीत आणून राज्याच्या प्रचार कार्यापासून दूर ठेवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.ईडी, सीबीआय, आयकरचा ससेमिरा त्यांच्या पाठीमागे आहे. परंतु आजवर तरी त्यांना अडचणीत आणण्यात विरोधक यशस्वी ठरलेले नाहीत. समर्थ प्रतिस्पर्धी देऊन त्यांना त्यांच्या मतदारसंघातच खिळवून ठेवण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे समजते. परंतु विरोधी पक्षांनी अजूनही या मतदार संघात उमेदवार जाहीर केलेला नाही.



मतदार, जातीनिहाय लोकसंख्या

मतदारसंघात एकूण दोन लाख २० हजार ४०९ मतदार असून त्यात सामान्य मतदार, अनिवासी भारतीय मतदार आणि सेवा मतदारांचा समावेश आहे. सर्वसाधारण मतदारांत १ लाख ९ हजार ८७६ पुरुष, एक लाख १० लाख ५०४ महिला आणि ११ इतर मतदार आहेत. मतदारसंघातील मतदार लिंग गुणोत्तर १००.५६ आहेआणि साक्षरतेचा अंदाजे दर ६५ टक्के आहे. २०११ च्या जनगणनेनुसार तीन लाख ५० हजार ८७७ लोकसंख्या असून त्यापैकी एक लाख ७८ हजार ५७२ पुरुष आणि एक लाख ७२ हजार ३०५ महिला आहेत. ९४.१७ टक्के हिंदू, ४.६८ टक्के मुस्लिम आणि ०.९७ टक्के ख्रिश्चन आहेत.

सलग चढत्या फरकाने विजय

२००८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ही जागा ७ हजार १७९ मतांच्या फरकाने (५.१ टक्के) जिंकली आणि ४८.३४ टक्के मतांची नोंद केली. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ही जागा ३१ हजार ४२४ मतांच्या फरकाने (१७.८४ टक्के) जिंकून एकूण मतदानाच्या ५६.७७ टक्के मते मिळवली. २०१३ मध्ये या जागेवर ८३.६३ टक्के मतदान झाले होते. २०१८ मध्ये, कनकपुरा विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख २२ हजार ६०२ मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या एक लाख ८६ हजार १५२ होती.काँग्रेसचे शिवकुमार विजयी झाले. त्यांना एकूण एक लाख २७ हजार ५५२ मते मिळाली. जनता दल (धर्मनिरपेक्ष) उमेदवार नारायण गौडा ४७ हजार ६४३ मतांसह दुसऱ्या स्थानावर गेले. त्यांचा ७९ हजार ९०९ मतांनी पराभव झाला. सुरवातीच्या काळात येथे अपक्ष उमेदवार निवडून आले. परंतु पुढे कॉंग्रेस पक्षाची स्थिती मतदारसंघात भक्कम झाली.मध्यंतरी जनतादल, धजद पक्षातून पी.जी.आर. सिधिया येथून सलग पाचवेळा विययी झाले. १९८३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे याच मतदारसंघात पोटनिवडणुकीत जनतापक्षाचे उमेदवार म्हणून विजयी झाले. त्यानंतर २००८ पासून शिवकुमारानी मतदारसंघातील पकड कायम ठेवली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने