ऊर्जानिर्मितीसाठी कोळशाचा वापर वाढताच

वॉशिंग्टन:  तापमानवाढीचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी कोळशाचा वापर टप्प्याटप्प्यांत बंद करण्याचे आश्‍वासन विविध देशांनी दिले असतानाही गेल्या वर्षात ऊर्जानिर्मितीसाठी वापरल्या गेलेल्या कोळशाचे प्रमाण वाढले आहे. तापमानात वाढ करणाऱ्या वायूंचा मुख्य स्रोत कोळसा हाच असतानाही हे वास्तव समोर आल्याने पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

जगातील विविध ऊर्जा प्रकल्पांमधून होणाऱ्या उत्सर्जनाची माहिती ठेवणाऱ्या ग्लोबल एनर्जी मॉनिटर या संस्थेने तयार केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. यानुसार, गेल्या वर्षभरात कोळशाद्वारे निर्माण झालेल्या ऊर्जेमध्ये १९.५ गिगा वॉटने वाढ झाली. या ऊर्जेतून दीड कोटी घरांना वीजपुरवठा होऊ शकतो. नव्याने उभारण्यात आलेले बहुतेक कोळसा प्रकल्प हे चीनमधील आहेत. तापमानवाढ रोखण्यासाठी सर्व देशांनी मिळून काही उद्दीष्ट्ये निश्‍चित केली आहेत. त्यामध्ये कोळशाचा वापर कोणत्या वर्षापर्यंत किती प्रमाणात कमी करायचा, हे ठरविण्यात आले आहे. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी दरवर्षी कोळशाचा वापर साडे चार टक्क्यांनी कमी होणे अपेक्षित असताना, गेल्या वर्षी प्रत्यक्षात तो एक टक्क्याने वाढला आहे.



अनेक नवे प्रकल्प चीनमध्येच

कोळसा प्रकल्पांची संख्या जितकी वाढत जाईल, उद्दीष्ट गाठणे तितकेच अवघड होत जाईल, असा इशारा अहवालात देण्यात आला आहे. गेल्या वर्षात १४ देशांमध्ये कोळसा प्रकल्प वाढले असून आठ देशांनी नव्या प्रकल्पांसाठी नियोजन केले आहे. चीन, भारत, इंडोनेशिया, तुर्की आणि झिम्बाब्वे या देशांमध्ये नवे कोळसा प्रकल्प उभेही राहिले आहेत आणि आणखी प्रकल्पांची घोषणाही झाली आहे. जगातील एकूण नव्या कोळसा प्रकल्पांपैकी ९२ टक्के प्रकल्प एकट्या चीनमध्ये आहेत. कोळशापासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेमध्ये चीनने २६.८ गिगावॉट, तर भारताने ३.५ गिगावॉट ऊर्जेची भर घातली आहे. चीनने १०० गिगावॉट ऊर्जानिर्मितीच्या कोळसाऊर्जा प्रकल्पांना मंजूरी दिली असून या वर्षात या प्रकल्पांचे काम सुरु होणार आहे.


सकारात्मक घडामोडी

युक्रेन युद्धामुळे युरोपातील अनेक देश जलविद्युत ऊर्जेकडे वळाले आहेत. अमेरिकेत १३.५ गिगावॉट ऊर्जेची निर्मिती करणारे कोळसाऊर्जा प्रकल्प बंद करण्यात आले आहेत. अमेरिकेबरोबरच आणखी १६ देशांनीही आपले काही कऊर्जा प्रकल्प बंद केले आहेत. जगभरात एकूण २५०० ऊर्जा प्रकल्प असून त्यापैकी कोळशावर चालणाऱ्या प्रकल्पांची संख्या एक तृतियांश आहे. २०१५ च्या पॅरिस करारानुसार, २०३० या वर्षापर्यंत श्रीमंत देशांमधील कोळशाचा वापर २०३० पर्यंत आणि विकसनशील देशांमधील कोळशाचा वापर २०४० पर्यंत बंद होणे आवश्‍यक आहे. म्हणजेच, दरवर्षी ११७ गिगावॉट ऊर्जेची निर्मिती करणारे कोळसा प्रकल्प बंद होणे आवश्‍यक आहे. गेल्या वर्षी मात्र हे प्रमाण फक्त २६ गिगावॉट इतकेच होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने