मोह,राग,द्वेषरूपी शत्रूंना जिंकलं अन् ते बनले 'महावीर'

मुंबई: अहिंसेचे पुजारी भगवान महावीर यांची आज जयंती ! 'जगा आणि जगू द्या' सर्व प्राणिमात्र समसमान आहेत, माणसाची ओळख ही त्याच्या जन्माने होत नसून त्याच्या कर्माने होते आत्म्याची उन्नती होताच तो परमात्मा बनतो, अशी शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांचा जन्म चैत्र शुद्ध त्रयोदशीला झालेला होता म्हणून हा दिवस 'महावीर जयंती ' च्या रूपाने साजरा केला जातो.अहिंसा, सत्य, अपरिग्रह, तप, त्याग, संयम ही मानवी जीवनाची मूल्ये आहेत, हे जाणून स्वतःला मिळालेले सम्राटपद सोडून महावीरांनी त्यागी जीवनाचा स्वीकार केला. तप, संयम, अहिंसा आचरणात आणून क्रोध, मान, माया, लोभ, मत्सर आदि विकारांवर विजय मिळविला.

 मानवी जीवनाचे सम्यकत्व जाणले. सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी, शांतीसाठी, मुक्तीसाठी सारे जीवन वेचले, भारतीय संस्कृतीची जडण घडण करणाऱ्या युगंधर पुरुषांत भगवान महावीरांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. या थोर पुरुषाने मनुष्याला आत्मविकासाचा मार्ग दाखविला. पारलौकिक कल्याण कसे साधावे याची जाणीव करून दिली.स्नेहातून व सहकार्यातून माणसांची संस्कृती फुलेल तर द्वेषाने आणि वैराने ती जळून जाईल" असे त्यांनी मुक्तकंठाने जगाला सांगित‌ले. यासाठीच लोकांनी परस्पर भेदांचे विसर्जन केले पाहिजे.मानवी समतेचा विचार मांडणाऱ्या या थोर महापुरुषाचा जन्म ख्रिस्तपूर्व ५९९ मध्ये, वैशालीचे राजे सिद्धार्थ व राणी त्रिशेला यांच्या उदरी कुंडग्राम येथे झाला. भगवान महावीर यांच्या जन्मापासूनच राजा सिद्धार्थाचे वैभव प्रताप, पराक्रम्, व शौर्य आणखीन वाढू लागले त्यामुळेच जन्मलेल्या बाळाचे नाव 'वर्धमान " असे ठेवण्यात आले. त्याच बरोबर वीर, अतिवीर, सन्मती, महावीर या नावाने ही ते ओळखले जाऊ लागले.

इसवी सनापूर्वीचे सहावे शतक हे भारतीय जीवनातल्या सामाजिक, राजकीय, धार्मिक संघर्षाचे, आस्थिरतेचे जणू प्रतिकच होते. धर्माच्या नावाखाली पशुहिंसा होत होती. यज्ञयाग चालू होते . होमहवन करण्यातच सारा धर्म सामावलेला आहे अशी लोकांची समजूत होती. जातिभेद पराकोटीला गेलेले होते. माणसाचे महत्व त्याच्या जन्माने ठरणाऱ्या जातीवर अवलंबून होते. कर्मकांड व दांभिकता यांना पूर येऊन अनेक दुष्ट रूढीनी माणसांची पिळवणूक होत होती. अज्ञानाच्या भाराखाली दडपून गेलेल्या या समाजाचे दर्शन महावीरांना अत्यंत अस्वस्थ करणारे ठरले. सामाजिक व धार्मिक दुर्दशेचे चित्र पाहून ते कसे बदलता येईल या एकाच कल्पनेने महावीर भारावून गेले. दु:ख आणि अज्ञान यांच्या मगरमिठीत सापडलेल्या जीवांना अखंड सुखाची आणि समाधानाची सनद मिळवून देण्यासाठी, 'संसाराच्या सर्व बंधनातून मुक्त होण्याचा त्यांनी निश्चय केला.



क्षत्रिय कुळात जन्म घेऊन, सर्व सुखसोयी, वैभव पायाशी लोळण घेत असताना सुद्धा महावीरांचे मन संसारात रमले नाही. ऐन तारुण्यात वयाच्या 30 व्या वर्षी घरादाराचा त्याग केला. नग्न दिगंबर बनून निर्जन वनामध्ये काटेरी भूमीशय्या, निळे आकाश ही त्यांची चादर व आपल्या बाहूंची उशी करून ते निरंतर आत्मचिंतनात मग्न असत. या तरुणाने १२ वर्षे एकाग्र चिंतन केले. त्यानंतर अखंड विहार करत, साधना करत ते जेव्हा मगध प्रांतात ऋजुकुला नदी त‌टावर आले तेव्हा तेथील साल वृक्षाखाली कठोर ध्यान साधनेत व्यस्त असताना वयाच्या ४२ व्या "वर्षी त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. मोह, राग, द्वेषरूपी शत्रूंना पूर्णपणे जिंकल्यामुळे ते खरे 'महावीर' बनले.

तीर्थंकर महावीरांचा प्रथम उपदेश राजगृही येथे झाला. त्यांच्या दिव्य विचाराने व उपदेशाने प्रभावित होऊन विख्यात ब्राह्मण इंद्रभुती गौतम हे त्यांचे प्रथम शिष्य बनले. इंद्रभूती गौतमांप्रमाणेच त्यांचे दोन विद्वान भाऊ अग्निभूती व वायुभूती हे ही आपल्या शिष्यांसह भगवान महावीरांचे विनम्र शिष्य बनले. महावीरांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव जनतेवर् व विद्वानांवर पडला आणि ते ही महावीरांचे शिष्य बनले. जीवनातील अनेकविध समस्या आणि दु:ख यांचा शोध घेऊन, त्यांची सूक्ष्म छाननी करून या धर्म- पुरुषाने अत्यंत सोप्या अशा अर्धमागधी भाषेतून उपदेश केला. महावीरांच्या धर्मसभेला 'समवशरण म्हणतात. या समवशरणात सर्व जातीचे, धर्माचे आणि संप्रदायाचे आबालवृद्ध बसलेले असत.

पशुंनाही बसण्याची सोय होती. त्यांच्या धर्मसभेत जसा समता- भाव होता तसा अन्यत्र दुर्लभ आहे. आज मानवामध्ये अनेक भिंती निर्माण झाल्या आहेत. त्या भिंती म्हणजे रंगभेद, वर्णभेद, जातीभेद कुलभेद, प्रांतभेद या होत. या भिंतीमुळे साऱ्या विश्वात' अशांतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजाच्या दैनंदिन जीवनात 'अहिंसा' मूल्याची सतत विटंबना होताना दिसते. अशावेळी या अहिंसेच्या पुजाऱ्याने सांगितलेले तत्वज्ञान आजही मार्गदर्शक ठरते.'अहिंसा तत्वज्ञान' ही महावीरानी जगाला दिलेली फार मोठी व मोलाची देणगी आहे. जैन धर्माची उभारणी अहिंसा तत्वावर झालेली आहे. भगवान महावीरांनी सांगितलेली अहिंसा ही केवळ त्यांच्या विचारातून जन्माला आलेली नाही तर मूक जीवाशी ते तादालय झाल्यावर अहिंसेचा जन्म झाला आहे. या मूक जीवांचे दु:ख, पीडा त्यांनी स्वतः अनुभवली व त्यामुळेच 'अहिंसा' त्यांच्या जीवनाचे परम तत्व बनले. राग-द्वेषादि विकार आत्म्याच्या ठायी उत्पन्न न होणे ही 'अहिंसा व विकार उत्पन्न होणे ही 'हिंसा ' असा जैनशास्त्राचा सारांश आहे.जाणून-बुजून कोणासही मारू नका, सर्वांवर प्रेम करा, सर्वांशी प्रेमाने बोला, सर्वांबद्दल आपलेपणाची भावना ठेवा हीच भगवान महावीरांनी सांगितलेली 'अहिंसा, भगवान महावीरांनी मानव कल्याणासाठी उपदेश देत संपूर्ण भारतभर 4 विहार केले. धर्म- प्रवचने दिली . त्यांच्या प्रवचनाने प्रभावित होऊन प्रत्येक प्रांतात त्यांच्या अनुयायांची संख्या वाढतच गेली.

भगवान महावीरांना प्रथम व आदर्श समाजसुधारक मानावे लागेल. आजच्या युगातही स्त्रियांना आपल्या, हक्कासाठी लढावे लागत आहे पण त्या वेळी महावीरांनी समाजाचा विरोध झुगारून आपल्या श्रमन संघात स्त्रियांना प्रवेश दिला होता ही एक क्रांतिकारी घटना आहे. चंदना ही महावीरांची प्रथम महिला शिष्या होती. प्राचीन भारतातील प्रसिद्ध मगध राज्याशी महावीरांचे रक्ताचे संबंध होते. भगवान महावीरांची मावशी 'चलना" ही प्रसिद्ध मगध राजा श्रेणिक बिंबिसार' यांची पत्नी होती. 'अजातशत्रू' हा चलनाचा पुत्र होता तर अजातशत्रूचा मुलगा 'उदायीन' हा महावीरांच्या विचारांचा पाईक होता." शस्त्रे मतभेद मिटवू शकत नाहीत. मने मोकळी करू शकत नाहीत तर परस्पर प्रीती- सहकार्य यातूनच मानवाची संस्कृती उमलते, फुलते व सुगंधाची दृष्टी करते"" याकरिता आजच्या या मंगलदिनी भगवान महावीरांचे स्मरण करुया. अहिंसा परमो धर्म:' अशी शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांनी सांगितलेली 'अहिंसा' ही मानवाच्या उच्चत्वाला परिपोष करणारी आहे. मानवांमध्ये समाजवाद रुजविण्याची विचारसरणी महावीरांनी २६०० वर्षापूर्वीच दिली. यावरून त्यांचे विचार किती पुरोगामी होते हे स्पष्ट होते. शेवटी वयाच्या ७२ व्या वर्षी श्री सिद्धक्षेत्र पावापूर' ' येथे भौतिक देहाचा त्याग करून महावीरांनी निर्वाणाची प्राप्ती करून घेतली. भगवान महावीरांचे जीवन म्हणजे परमात्मा बनण्याचा प्रेरक मार्ग होय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने