चित्ता शोधतोय नैसर्गिक अधिवास

नवी दिल्ली : जंगलामध्ये सोडण्यात आलेला चित्ता आता त्याच्या अधिवासाचा शोध घेऊ लागला असून हे सुचिन्ह आहे असे स्पष्ट मत पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने मांडले. मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील एक चित्ता जंगलाच्या बाहेर गेल्याने अधिकारी चिंतेत पडले होते. दोन एप्रिल रोजी हा चित्ता जंगलातून भरकटला होता. वन अधिकाऱ्यांनी त्याला शोधून काढत पुन्हा जंगलामध्ये आणून सोडले.अतिरिक्त वनसंचालक एस.पी. यादव म्हणाले की, ‘‘ चित्त्याच्या आयुष्यातील ही एक नैसर्गिक घटना असून त्याबाबत चिंता करण्याचे काही कारण नाही. चार चित्त्यांना पूर्णपणे मोकळे सोडण्यात आले असून ते आता जंगलामध्ये मुक्त भटकणारे प्राणी झाले आहेत. या प्राण्यांची हालचाल नैसर्गिक आहे. हे चित्ते आता निसर्गतः त्यांच्यासाठी नेमका कोणता अधिवास सुरक्षित आहे त्याचा शोध घेऊ लागले असून ही एक चांगली गोष्ट आहे.’’



यादव हे प्रोजेक्ट टायगरचे देखील प्रमुख आहेत. चित्ता आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी चित्ता मित्रांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. वन अधिकाऱ्यांनी ५१ खेड्यांमधील चारशे चित्ता मित्रांना प्रशिक्षण दिले असून त्यामध्ये शालेय शिक्षक, गावप्रमुख आणि पटवारी यांचा समावेश आहे. चित्त्यांचा मोठा धोका शेळ्या आणि मेंढ्यांना आहे, हे विचारात घेऊन आम्ही भरपाईचा देखील आराखडा तयार केला आहे. प्रत्येकाला योग्य प्रमाणात भरपाई देण्यात येईल असे यादव यांनी स्पष्ट केले.

भरकटलेल्या चित्त्याकडून शिकार

कुनोमधून बाहेर पडल्यानंतर ओबान हा चित्ता नजीकच्या खेड्यामध्ये फिरत होता. हा चित्ता बुधवारी शिवपुरी जिल्ह्यातील बैरड भागामध्ये पोचला. याच ठिकाणी त्याने भूक लागल्याने एका काळविटाची शिकार देखील केली. शेवटी गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वनखात्याच्या पथकाने या चित्त्याला पकडून कुनोमध्ये आणले. त्याला पालपूर जंगल परिसरामध्ये सोडण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने