“बाळासाहेबांना नाटक कसं वाटलं?” प्रयोगानंतर भरत जाधवने केलेला राज ठाकरेंना फोन; समोरून असं काही उत्तर मिळालं की…

मुंबई : भरत जाधव हा मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता आहे. गेली अनेक वर्ष ते त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आला आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांत वैविध्यपूर्ण भूमिका उत्कृष्टपणे साकारत त्याने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं आहे. एकदा बाळासाहेब ठाकरे त्याच्या नाटकाच्या प्रयोगाला आले होते. यावेळचा एक किस्सा त्याने नुकताच ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या मुलाखतीत सांगितला.

‘महाराष्ट्राची लोकधारा’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘सही रे सही’, ‘श्रीमंत दामोदर पंत’ अशा अनेक नाटकांमधून काम करत भरत गेली अनेक वर्ष रंगभूमीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या जवळपास प्रत्येक प्रयोगाला नाट्यगृहाच्या बाहेर हाउसफुलची पाटी लागते. एकदा त्याचं ‘सही रे सही’ नाटक पाहायला बाळासाहेब ठाकरे आले होते. ते नाटक पाहून त्यांची काय प्रतिक्रिया होती हे भरतने शेअर केलं.



भरत जाधव म्हणाला, “बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा माझ्या नाटकाला उपस्थिती लावली होती तेव्हा त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यांना इतका वेळ बसवेल की नाही अशी शंका वाटत होती. पण त्यांनी संपूर्ण नाटक पाहिलं. त्या रात्री मी राज ठाकरे साहेबांना फोन केला आणि त्यांना विचारलं की, बाळासाहेबांना नाटक कसं वाटलं? तेव्हा ते म्हणाले, ते घरी आल्यापासून गलगलेंसारखं बाळासाहेब उठले, बाळासाहेब निघाले असंच बोलत आहेत. गलगले या व्यक्तिरेखेचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला होता.”

बाळासाहेब ठाकरे त्यांच्याकडून मिळालेली ही प्रतिक्रिया भरत जाधवसाठी अविस्मरणीय होती. ही प्रतिक्रिया तो कधीही विसरू शकत नाही असंही त्याने सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने