Cyclone Mocha Update: 'या' राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

इंडिया : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मोचा चक्रिवादळ काल म्यानमारच्या किनारपट्टीवर धडकले आहे. या वादाळाचा परिणाम म्हणून देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस तर काही राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वा मेदिनीपूर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यांचा किनारी भाग हाय अलर्टवर आहे. पीटीआयच्या अहवालानुसार, लाईव्ह गार्ड्स एनडीआरएफची पथकांसह दिघा-मंदारमणी किनारी भाग देखील सतर्क आहे. तसेच लोकांनी समुद्राजवळ किंवा समुद्रकिनारी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे. तर हवामान विभागानं नियमावली जारी केली आहे.




भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मोचा चक्रिवादळ रविवारी म्यानमारच्या किनारपट्टीवर धडकले. म्यानमारच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर या वादळाचा प्रभाव काही अंशी कमी झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मोचा वादळाचा परिणाम म्हणून दिल्ली -एनसीआरसह पंजाब, हरियाणा, चंदीगड तसेच राजस्थानच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्याचबरोबर ईशान्य भारतातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपूरा, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे पूर्व भारतात उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आला आहे. पूर्व भारतात कमाल तापमानामध्ये 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने