मुंबईसह कोकण किनारपट्टीला अलर्ट! चक्रीवादळ येणार, अरबी समुद्रात मोठी घडामोड

मुंबई : अरबी समुद्रात खोल समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन तासांत या चक्रीवादळाचा वेग हा ११ किलोमीटर प्रतितास इतका आहे. हे चक्रीवादळ आता उत्तरेच्या दिशेने पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ पुढे सरकेल तसं पुढील १२ तासांत त्याची तीव्रता वाढत जाईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हे चक्रीवादळ खोल समुद्रात असल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर फार पावसाची शक्यता नाही, असं प्रादेशिक हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. चक्रीवादळ हे खोल समुद्रात आहे. या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.



ताज्या माहितीनुसार अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती तयार झाली आहे. पुढील २४ तासांत उत्तरेच्या दिशेने ते पुढे सरकेल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. आज पहाटेच्या स्थितीचा अभ्यास करून हवामान विभागाने ही माहिती दिली आहे. पुढच्या २४ तासांत ते उत्तर दिशेने सरकणार आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रात आणि दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात सध्या ही स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईपासून ११२० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसळीकर यांनी ट्विट करून दिली आहे.

भारतीय हवामान विभागानुसार याबाबत ५ जूनला म्हणजेच कालच माहिती दिली होती. दक्षिण पूर्व अरबी समुद्रात एक चक्रीवादळासारखी निर्माण होत आहे. यामुळे पुढील काही तासांत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलं होतं. या चक्रीवादळाला बिपरजॉय असं नाव देण्यात आलं आहे. हे चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टी आणि उत्तरेच्या दिशेने सरकत जाईल, असं स्कायमेट या खासगी संस्थेनं म्हटलं आहे.

चक्रीवादळाला बांगलादेशने बिपरजॉय, असं नाव दिलं आहे. उष्ण कटिबंधातील चक्रीवादाळांना प्रादेशिक स्तरावरील नियमांनुसार नाव दिलं जातं. हिंदी महासागरातील चक्रीवादळांना नाव देण्यासाठी २००४ मध्ये एका सूत्रावर सहमती झाली होती. या क्षेतील आठ देशांनी म्हणजेच भारत, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड यांनी नावांची एक यादी दिली आहे. चक्रीवादळ येतं तेव्हा क्रमवारीनुसार ही नावं दिली जातात.

असं दिलं जातं नाव

लक्षात राहील, सहज उच्चारता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे ते अपमान करणारं आणि वादग्रस्त नसेल असं नाव चक्रीवादळाला दिलं जातं. ही नावं वेगवेगळ्या भाषेतूनही निवडली जातात. विविध भागातील नागरिक ते ओळखू शकतील. नामकर यंत्रणा काळानुसार विकसित केली गेली आहे. अभ्यासाच्या सुरुवातीला नावांची निवड वर्णानुक्रमाने केली जात होती. यात वर्णमालेतील प्रत्येक अक्षरानुसार एक नाव दिलं जात होतं. पण ही यंत्रणा भ्रम निर्माण करणारी आणि लक्षात ठेवण्यासाठी अवघड होती. यामुळे सध्या असलेली प्रणाली विकसित करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने