३० जूनलाच का साजरा केला जातो सोशल मीडिया दिन?

स्मार्टफोन आणि सोशल मीडिया हे आता आपल्या जीवनातील महत्त्वाचे घटक झाले आहेत. ही बातमी देखील कदाचित तुम्ही एखाद्या सोशल मीडियावरच पाहिली असू शकते. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का, की आज सोशल मीडिया दिन आहे? ३० जून हा दिवस जागतिक सोशल मीडिया दिन म्हणून साजरा केला जातो.
सोशल मीडियाला सन्मान देण्यासाठी २०१० साली या दिवसाची सुरुवात करण्यात आली. आजच्याएवढा तेव्हा सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात पसरलेला नव्हता. मात्र, भविष्यातील त्याची लोकप्रियता वाढण्याची चिन्हं तेव्हाच दिसू लागली होती.



३० जून हा दिवस का?
खरंतर, आजच्याच दिवशी सोशल मीडिया दिन साजरा करण्यामागे एक खास कारण आहे. मॅशेबल या टेक्नॉलॉजी आधारित गोष्टींची माहिती देणारी एक वेबसाईट यासाठी कारणीभूत आहे. या वेबसाईटने ३० जून २०१० रोजी जागतिक सोशल मीडिया दिन साजरा केला. पुढील वर्षी देखील हा ट्रेंड सगळीकडे सुरू राहिला. यानंतर हा दिवस जगभरात सगळीकडेच सोशल मीडिया दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
पहिला सोशल मीडिया
जगातील पहिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा फेसबुक किंवा ऑर्कुट नव्हता. तर, Sixdegrees नावाचा एक प्लॅटफॉर्म होता. अँड्र्यू वेनरिच नावाच्या व्यक्तीने याची स्थापना केली होती.
यावर तुम्ही आताच्या फेसबुकप्रमाणे मित्रांशी आणि कुटुंबीयांशी कनेक्ट राहू शकत होता. तसंच, पोस्ट आणि लाईक करण्याचं फीचरही यात होतं. १९९६-९७ साली सुरू झालेलं हे प्लॅटफॉर्म २००१ मध्ये बंद झालं होतं. आधुनिक जगातील पहिला सोशल मीडिया हे श्रेय मात्र Friendster नावाच्या प्लॅटफॉर्मला जातं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने