Chandrayaan 3 Launch Time: प्रक्षेपण कधी, लँडिंग कधी,...; इस्रोच्या मोहिमांची अगदी अचूक वेळ कशी ठरवली जाते?

इस्रोच्या चांद्रयान ३ चं अवघ्या काही वेळातच प्रक्षेपण होणार आहे. २ वाजून ३५ मिनिटे ही प्रक्षेपणाची वेळ निश्चित झाली आहे.

पहिल्यांदा या चांद्रयानाचं प्रक्षेपण १३ जुलै ते १९ जुलैदरम्यान होणार असल्याची घोषणा झाली. त्यानंतर प्रक्षेपणाची नेमकी तारीख आणि वेळ घोषित करण्यात आली. हाच दिवस चांद्रयान मोहिमेसाठी निवडण्याचं काय कारण ? जाणून घ्या.

चांद्रयान ३ आज म्हणजे १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता लाँच होणार आहे. चांद्रयान मोहिमेचा हा मुहुर्त टळला तर या मोहिमेला आणखी एक महिना लागू शकतो.




यामागे काय कारण आहे? हा मुहुर्त कोणत्या गोष्टींवरुन आणि कसा ठरवला जातो? सूर्य, चंद्र, इतर ग्रह आणि अवकाशातल्या बाह्य घटकांचा यावर कसा परिणाम होतो? 

आपण नेहमी प्रवास करण्यापूर्वी जसं ट्रॅफिक, गाडीचा वेग, अंतर, ते पार करण्यासाठीचा वेळ, गाडी कोणती आहे, या सगळ्याचा विचार करतो. तशाच पद्धतीचा विचार अंतराळ मोहिमेमध्येही करावा लागतो. पण अंतराळ प्रवासामध्ये एक फरक असतो. हा फरक म्हणजे अंतराळ प्रवास करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून जावं लागतं.

उपग्रह सोडणारे रॉकेट्स प्रक्षेपित झाल्यावर आकाशात गोलाकार मार्ग घेऊन एका विशिष्ट कक्षेत उपग्रह सोडतात. गुरुत्वाकर्षणामुळे स्थिर वाटणारी पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार फिरत असते, तर चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. या गोष्टी स्थिर नसल्याने गुरुत्वाकर्षणाची कक्षा ओलांडताना विचार करावा लागतो.

अंतराळात पृथ्वीच्या कक्षेत जाताना प्रक्षेपण तारखेच्या दिवशी हवामानाच्या परिस्थितीची तसंच पृथ्वीची आणि चंद्राची स्थितीची माहिती घ्यावी लागते. तसंच दोघांची खगोलीय स्थितीही तपासावी लागते.

चंद्रयान सुरुवातीला पृथ्वीभोवती फिरतं, हळूहळू त्याचा अपोजी वाढतो, गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे कधी जायचं हेही चंद्राच्या स्थितीवर ठरतं.

इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथ यांच्या म्हणण्यानुसार, १४ जुलै रोजी अवकाशात झेपावणारं चांद्रयान ३ परिस्थिती पाहून २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी लँडरचं प्रक्षेपण करेल.

चंद्रावर उतरण्यासाठी परिस्थिती योग्य असेल तरच २३ ऑगस्टला उतरण्याचा प्रयत्न करेल नाहीतर आणखी एका महिन्यानंतर उतरण्याचा प्रयत्न करेल. पण जर हे लँडर पाठवायला एक दिवस जरी उशीर झाला, तर ते अपेक्षित दिवशी ठरलेल्या ठिकाणी पोहोचू शकणार नाही.

सूर्यप्रकाशाचं महत्त्व काय?

चंद्रावर उतरणाऱ्या आणि संशोधन करणाऱ्या लँडर, रोव्हर मॉड्युलला काम करण्यासाठी वीज लागते. ही वीज सोलार पॅनेलमधून मिळते, त्यामुळे त्यांना सूर्यप्रकाशाची गरज असते.

चंद्र स्वयंप्रकाशित नाही. चंद्रावर फक्त १४ दिवस सूर्यप्रकाश मिळतो, बाकीचे १४ दिवस तिथे अंधार असतो. त्यामुळे सूर्यप्रकाश असलेले दिवस चांद्रयानाच्या लँडर आणि रोव्हरसाठी महत्त्वाचे असतात. म्हणून त्यांचं आयुष्य फक्त १४ दिवसांचं असतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने