हवामान बदलामुळे ५६ टक्के महासागरांच्या रंगांत बदल

हवामान बदल व त्याच्या परिणामांचा अनुभव जगभरात ठळकपणे येऊ लागला आहे. मानवी कारणांमुळे झालेल्या हवामान बदलांचा महासागरांनाही फटका बसला असून गेल्या दोन दशकांत जगातील निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे ५६ टक्के महासागरांचा रंग लक्षणीयरित्या बदलला आहे, असे एका संशोधनातून समोर आले आहे.

अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) व इतर इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी यासंदर्भात संशोधन केले असून, संशोधनाचे निष्कर्ष ‘नेचर’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत.

मानवी डोळ्यांसाठी समुद्राच्या रंगातील हा बदल सूक्ष्म असल्याने तो साध्या डोळ्यांनी ओळखणे शक्य नाही. महासागरांचा रंग हा त्यातील सजीव सृष्टी व इतर सामग्रीचे प्रतिबिंब असते. विषुववृत्ताजवळील प्रदेशात हा रंग हळूहळू हिरवा झाला असून महासागरांच्या पृष्ठभागाच्या परिसंस्थेत बदल झाल्याचे त्यातून सूचित होते.




महासागराच्या वरील भागात असलेल्या फायटोप्लँक्टन या वनस्पतीसारख्या सूक्ष्मजीवांत असलेल्या क्लोरोफिल या हिरव्या रंगद्रव्यांमुळे सागराला हिरवा रंग येतो. त्यामुळेच, हवामान बदलाला प्रतिसाद तपासण्यासाठी संशोधक फायटोप्लँक्टनचे निरीक्षण करण्यासाठी उत्सुक आहेत.

मात्र, हवामान बदलाचा परिणाम दिसण्यापूर्वी क्लोरोफिलमधील बदलांचा मागोवा घेण्यासाठी ३० वर्षे लागतील कारण क्लोरोफिलमधील नैसर्गिक, वार्षिक बदल मानवी वर्तनावर प्रभाव टाकतील, असा दावा संशोधकांनी यापूर्वीच्या संशोधनाद्वारे केला आहे.

२०१९ मध्ये अहवालाच्या सहलेखिका स्टेफनी डटकीविक्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असे दर्शविले की, क्लोरोफिलमधील बदलांपेक्षा कमी वार्षिक भिन्नता असणाऱ्या महासागरांच्या इतर रंगांचे निरीक्षण करण्यातून हवामान बदलामळे होणाऱ्या बदलांबद्दल अधिक स्पष्ट संकेत मिळतील. त्याचप्रमाणे, हे बदल ३० वर्षांपेक्षा २० वर्षांत स्पष्ट होतील.

राष्ट्रीय समुद्रविज्ञान केंद्रातील संशोधक बी.बी.कैल म्हणाले, की स्पेक्ट्रमच्या तुकड्यांमधून केवळ एका संख्येचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करण्याऐवजी संपूर्ण स्पेक्ट्रम पाहणे योग्य आहे. कैल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह २००२ ते २०२२ दरम्यान उपग्रहांनी टिपलेल्या निरीक्षणातून पृथ्वीवरील सर्व सात महासागरांच्या रंगांचे संख्यात्मक विश्लेषण केले.

एका वर्षात प्रादेशिकदृष्ट्या ते कसे बदलतात हे पाहून त्यांनी सुरुवातीला रंगांच्या नैसर्गिक फरकांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी दोन दशकांतील फरकाचेही निरीक्षण केले.

या सर्व बदलांवर हवामान बदलांचा होणारा परिणाम समजून घेण्यासाठी त्यांनी डटकीविक्झ यांच्या पृथ्वीवरील महासागरांची हरितगृहवायूंसह आणि हरितगृहवायूंशिवायच्या दोन परिस्थितीतील आराखडे तयार केले. यापैकी हरितगृहवायूंच्या आराखड्याने निम्म्या महासागरांचा रंग २० वर्षांत बदलण्याचा अंदाज वर्तविला. तो कैल यांनी उपग्रह डेटाच्या विश्लेषणाच्या जवळपास जाणारा होता.

महासागरांच्या रंगात बदल होण असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होतेच. मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या हवामान बदलामुळे घडणारे हे बदल कायमस्वरूपी आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने