सांगली, कोल्हापूरची पूरहानी टाळण्यासाठी अलमट्टीचा विसर्ग दुप्पट

सांगली : विविध धरणांतून होत असलेला विसर्ग लक्षात घेऊन पुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातील विसर्ग गुरुवारी अकरा वाजल्यापासून दुप्पट म्हणजे ७५ हजारांवरून दीड लाख क्युसेक करण्यात येत आहे. कृष्णेतील पाणी पातळी स्थिर असली तरी वारणेचे पाणी पात्राबाहेर आहे. यातच धरणातील साठा ८० टक्के झाला आसून गुरुवारी विसर्ग वाढवण्यात येत आहे. वारणाकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




चांदोली, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून बुधवारी दिवसभर उघडीप दिल्यानंतर रात्रीपासून पुन्हा संततधार सुरू झाला आहे. दूधगंगा, तुळशी, पाटगाव धरण वगळता सर्व धरणांतून विसर्ग सुरू आहे. चांदोलीतून विसर्ग वाढवून ६७८० क्युसेक करण्यात आला आहे. यामुळे वारणा नदीपात्रातील पाणीपातळी वाढत आहे. कृष्णेची पाणीपातळी अजूनही मर्यादेत असून स्थिर आहे. चांदोली धरणाच्या वक्राकार दरवाजातून आज सकाळी १० वाजतापासून ५ हजार १५० क्युसेकचा आणि पायथा विद्युतगृहातून १६३० क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदीपात्रातील पाणीपातळी वाढणार असून नदी चार दिवसांपासून पात्राबाहेर प्रवाहित आहे. कोकरूड बंधारा गेल्या आठ दिवसांपासून पाण्याखाली असून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्याला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावर वाहतूक बंद आहे.

दरम्यान, पंचगंगा, वारणा नदी पात्रातील पाणी वाढल्याने पूराचा धोका निर्माण झाला आहे. त्यात कृष्णा नदीच्या उपनद्यांमधूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यने अलमट्टी धरणात पाण्याची आवक वाढत आहे. राधानगरी व चांदोली धरणातील विसर्ग विचारात घेऊन अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेक प्रति सेकंद विसर्ग करण्यात येत आहे. धरणात आज सकाळी आठ वाजता १ लाख ६१ हजार ७४७ क्युसेक प्रति सेकंद पाण्याची आवक असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने