ताकारी लाभक्षेत्रातील शेकडो हेक्टर शेती 'कोयने'वर अवलंबून; पाऊस नसल्याने बळीराजावर मोठे संकट

कायम दुष्काळी असणाऱ्या कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील बहुतांश गावांना मागील २५ वर्षांपासून सुजलाम्-सुफलाम् केलेल्या ताकारी योजनेचे भवितव्य कोयना धरणातील जलसाठ्यावर अवलंबून असते.

यंदाच्या पावसाळ्यात कोयना धरणातील पाण्यात अपेक्षित वाढ होत नसल्याने ताकारी लाभक्षेत्रातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेकडो हेक्टर शेती केवळ कोयना धरणातील पाण्यावर अवलंबून आहे.

यापूर्वी दरवर्षी या भागात कमी पाऊस पडत गेला तरी कोयना धरण भरले की ताकारी लाभक्षेत्रातील शेतकरी निश्चिंत असतात. कारण याच ताकारी पाण्याने मागील २५ वर्षांत वांगी भागात प्रचंड आर्थिक समृद्धी आणली आहे. ताकारीच्या पाण्याने या भागात दृष्ट लागण्यासारखी शेती पिकून सर्वसामान्य लोकांच्या जिवनात झालेला आर्थिक बदल इथली जनता अनुभवत आहे.




ऊस, द्राक्ष, केळी, हळद, आले याशिवाय फळभाज्या व पालेभाज्या उत्पादनातून शेतक-यांनी दरवर्षी करोडो रुपये मिळविले आहेत. शेतकऱ्यांच्या या उत्तरोत्तर आर्थिक प्रगतीला यावर्षी मात्र दृष्ट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, सदर तीनही तालुक्यात यंदा दीड महिना उलटूनही पावसाने दडी मारली आहे.

टंचाईसदृश्य परस्थिती निर्माण होऊन पिण्याच्या पाण्याचेही वांदे सुरु झाले आहेत. त्यामुळे शेतीला चटके बसून उभी पिके करपू लागली आहेत. असे झाले तरी भविष्यात ताकारी योजना सुरु होऊन आपणास हमखास उन्हाळभर पाणी मिळते, याची शाश्वती लोकांना असते. परंतु, यंदा ताकारी योजनेला पाणीपुरवठा करणाऱ्या कोयना धरणावरच पावसाची अवकृपा असून भर पावसाळ्याच्या दीड महिन्यात अवघा २३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

शिवाय मागील पाच दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. परिणामी यंदा धरण भरणार की नाही? याची धाकधूक वाढली आहे. कारण या धरणावरच पश्चिम महाराष्ट्रातील अर्थकारण अवलंबून आहे. दुर्दैवाने कोयना धरणात आवश्यक पाणीसाठा न झाल्यास नदीकाठच्या आणि सिंचन योजनांवरील लाभक्षेत्राचे अपरिमीत नुकसान होणार आहे.

मागील सात वर्षांतील जुलैपर्यंतचे कोयना धरणातील पर्जन्यमान

वर्ष महिना (जुलैअखेर)

२०१७ ३२६३ मि.मी.

२०१८ ३४६१ मि.मी.

२०१९ २११४ मि.मी.

२०२० १००७ मि.मी.

२०२१ २१७७ मि.मी.

२०२२ १९९८ मि.मी.

२०२३ (११ जुलै) ८८५ मि.मी.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने