जोतिबा डोंगराला जाताय? मग, ही बातमी आधी वाचा; 'हा' मुख्य मार्ग बनलाय धोकादायक!

जोतिबा डोंगर : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरचा (Kolhapur) मुख्य रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाण्याचा टाका भागातील रस्ता पावसामुळे खचण्यास सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून गत पावसाळ्यापासूनच रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.

सध्या रस्त्यावरून लोखंडी खांब लावून मध्य भागातून दुचाकीसाठी जागा करून वाहतूक सुरु आहे. मात्र चारचाकी वाहनांसह सर्व इतर वाहतूक गायमुख तलाव मार्गे सुरु आहे. कुशिरे जोतिबा रस्त्यावर जॉकवेलच्या परिसरात रस्ता खचू लागला आहे.



रस्त्याकडेला मोठा खड्डा पडला होता. तो दोन दिवसांपूर्वी बुजवला आहे, परंतु आजच्या पावसाने आणखी खड्डा पडला आहे. मुख्य मार्ग असल्याने वाहनचालकांना रात्री धोका आहे. पाण्याचा टाका भागात पाच वर्षांपासून रस्ता तुटून जातो. गतवर्षीही रस्ता मोठ्या प्रमाणात खचला होता.

गत जुलैलाच संभाव्य धोका ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. तीर्थक्षेत्र भीमाशंकरजवळ वळणावर लोखंडी खांब लावून हा रस्ता बंद केला आहे. जोतिबा डोंगरावर सतत दाट धुके थंडी तसेच पावसाची रिपरिप असते. पाण्याचा टाका भागात पाणी साचत असल्याने दलदल होते.

परिणामी, रस्ता तुटून जातो. येथे सलग पाच वर्षांपासून रस्ता तुटत आहे. त्यामुळे या रस्त्याची तज्ज्ञांमार्फत पाहणी करून भूगर्भ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. जोतिबा डोंगरचा कायमस्वरूपी मुख्य रस्ता करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने