'चांद्रयान-३'च्या चंद्राभोवतीच्या प्रक्रिया पूर्ण; आता प्रॉपल्शन आणि लँडर होणार वेगळे

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३ मोहीम अगदी यशस्वीपणे पुढे जात आहे. आज (16 ऑगस्ट) सकाळी साडे आठ वाजता चांद्रयानाने आणखी एक टप्पा पूर्ण केला. चांद्रयानाच्या चंद्राभोवतीच्या प्रक्रिया आता पूर्ण झाल्या असून, लवकरच प्रॉपल्शन आणि लँडर हे एकमेकांपासून वेगळे होणार आहेत.

इस्रोने आज ट्विट करत याबाबत माहिती दिली. सध्या चांद्रयान हे चंद्राभोवती 153x163 एवढ्या कक्षेत फिरत असल्याचं इस्रोने सांगितलं आहे. आता पुढील टप्प्यामध्ये उद्या (17 ऑगस्ट) प्रॉपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल हे एकमेकांपासून वेगळे होतील. याची वेळ अद्याप इस्रोने जाहीर केली नाही.




चांद्रयानामध्ये असणाऱ्या लँडरच्या आत रोव्हर फिट करण्यात आलं आहे. या दोन्हीला मिळून लँडर मॉड्यूल म्हटलं जातं. आता प्रॉपल्शन मॉड्यूल हे लँडर मॉड्यूलला चंद्रापासून 100 किलोमीटर उंचीवरील कक्षेत नेईल. त्यानंतर हे दोन्ही एकमेकांपासून वेगळे होतील.

यानंतर लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने प्रवास करेल. साधारणपणे 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. 14 जुलै रोजी चांद्रयान-३ ने अवकाशात झेप घेतली होती.

दक्षिण ध्रुवावर उतरण्याची शर्यत

चांद्रयान-3 च्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरणार आहे. अर्थात, रशियाचं लूना-25 हे यानदेखील सध्या चंद्राच्या दिशेने प्रवास करत आहे. हे यान 21 ऑगस्ट रोजी चंद्रावर लँड करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शर्यतीत रशिया बाजी मारू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने