Nipah Virus: केरळमधील रुग्णसंख्येमुळे वाढली डोकेदुखी! शेजारील राज्यांनी जारी केला अलर्ट

जग कोरोनामधून सावरत असतानाच निपाह व्हायरसने डोकेदुखी वाढवली आहे. निपाह व्हायरसच्या रुग्णांची संख्या केरळमध्ये दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. केरळ सरकारनेही यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. तामिळनाडूसह कर्नाटकने खबरदारीचा उपाय म्हणून अलर्ट जारी केला आहे.
केरळमध्ये निपाह व्हायरसची वाढती रुग्णसंख्या पाहता, तामिळनाडू सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे. लोकांना केरळच्या ज्या भागात रुग्णसंख्या जास्त प्रमाणात आहे. त्या भागात अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाने केरळच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये (कोडागू, दक्षिण कन्नड, चामराजनगरा आणि म्हैसूर) आणि केरळपासून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवरील तपासणीतही वाढ करण्यात आली आहे.


केरळमधील आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयाने माहिती देताना सांगितले की, कोळीकोड येथील रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या ३९ वर्षीय व्यक्तीमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे.
प्राण्यांपासून निपाह व्हायरस पसरतो
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, निपाह व्हायरस एक झुनोटिक व्हायरस आहे. म्हणजे प्राण्यांच्या माध्यमातून तो माणसात पसरतो. काहीवेळा तो खाण्यापिण्याद्वारे आणि व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो.
मलेशियातील सुंगाई निपाह या गावात 1999 मध्ये निपाहची पहिली घटना समोर आली होती. त्यामुळे या विषाणूला निपाह असे नाव देण्यात आले आहे.
हा विषाणू कसा पसरतो?
हा विषाणू वटवाघळांच्या माध्यमातून मानवांमध्ये पसरतो. त्याचबरोबर डुक्कर, कुत्रे, मांजर, घोडे आणि शक्यतो मेंढ्यांमधून देखील हा विषाणू पसरू शकतो.
जर एखाद्या व्यक्तीला निपाह व्हायरसची लागण झाली असेल तर तो इतरांनाही संक्रमित करू शकतो.
निपाह व्हायरस किती धोकादायक आहे?
निपाह व्हायरस कमी संसर्गजन्य परंतु अधिक प्राणघातक मानला जातो. याचा अर्थ असा की कमी लोकांना याची लागण होऊ शकते, परंतु मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. केरळमध्ये जेव्हा निपाह विषाणूचा प्रसार झाला तेव्हा त्याचा मृत्यूदर ४५ ते ७० टक्के होता.
एवढेच नाही तर निपाह व्हायरसमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही याची लागण होऊ शकते. अशा परिस्थितीत निपाह बाधित व्यक्तीचे अंतिम संस्कार करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
निपाह व्हायरसची लक्षणे कोणती?
जर एखाद्या व्यक्तीला निपाह विषाणूची लागण झाली तर त्याला जास्त ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यात अडचण, घसा खवखवणे, अॅटिपिकल न्यूमोनिया यांसारखी लक्षणे दिसतात.
त्याच वेळी, परिस्थिती अधिक गंभीर असल्यास, व्यक्ती 24 ते 48 तासांच्या आत एन्सेफलायटीसची शिकार होऊ शकते आणि कोमात जाऊ शकते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने