रात्री जागणाऱ्यांना होऊ शकतो ‘टाईप २’ मधुमेह; जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात…

आजच्या आधुनिक जीवनशैलीत अनेकांना रात्री जागण्यास आवडते. रात्री उशिरा झोपणे सकाळी उशिरा उठणे किंवा लवकर उठणे, झोपण्याच्या वेळांमधील अनियमितता, कार्यालयीन वेळेत बैठे काम, खाण्याचे प्रमाण, व्यायामाचा अभाव अशा जीवनशैलीमुळे रक्तातील साखर वाढू शकते. अशा लोकांना मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसच्या प्रतिनिधींनी फोर्टिस-सीडीओसी हॉस्पिटल फॉर डायबिटीस अँड अलाईड सायन्सेसचे वरिष्ठ डॉ. अनुप मिश्रा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी रात्री जगणाऱ्या लोकांना होणारा मधुमेह, योग्य दिनक्रम कोणता यासंदर्भात केलेले मार्गदर्शन जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

”अनेक लोकांना रात्रीची जागरणे करण्यास आवडते. काही लोक संध्याकाळनंतर अधिक कार्यक्षम असलेली दिसतात. दिवसभर डेस्क जॉब, व्यायामाचा अभाव, अपुरी किंवा अनियमित झोप यामुळे मधुमेह होण्याची शक्यता १९ टक्क्यांनी वाढते. अयोग्य जीवनपद्धती, अनियमितता मधुमेह होण्याची जोखीम वाढवत असते., ” असे डॉ. अनुप मिश्रा यांनी सांगितले.



अमेरिकेमध्ये ६३ हजारांहून अधिक महिला परिचारिकांवर केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, रात्री जागून जे काम करतात आणि दिवसा आराम करतात त्यांना टाईप-२ मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. मद्यपान करणे, कमी दर्जाचा आहार घेणे, व्यायाम कमी करणे, जंकफूड खाणे यामुळे मधुमेह किंवा मधुमेहपूर्व अवस्था होऊ शकते. आनुवंशिकता आणि जीवनशैली हे दोन्ही मुद्दे मधुमेहासंदर्भात महत्त्वाचे ठरतात.

रात्री कार्यक्षम राहिल्यामुळे मधुमेह का होतो ?

संध्याकाळनंतर काही लोक अधिक कार्यक्षम असतात, जेवणानंतरही काही लोक स्नॅक्स खातात, अयोग्यवेळी व्यायाम करतात किंवा व्यायाम न करत नाहीत, यामुळे मधुमेह होऊ शकतो. ज्यांना संध्याकाळचा क्रोनोटाइप आहे, अशा लोकांची झोप अनियमित असते, त्यामुळे रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण कमी-जास्त होऊ शकतं. क्रोनोटाइपमुळे हार्मोन्सवरही परिणाम होतो. प्रकाश पडल्यावर मेलाटोनिन अधिक स्रवते.मेलाटोनिनमुळे झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे रात्री जे मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही बघतात, त्यांना लवकर झोप येत नाही. तसेच कोर्टिसोल संप्रेरकावरही परिणाम होतो. कोर्टिसोल संप्रेरक इन्सुलिनवर परिणाम करत असते. इन्सुलिनवर झालेला परिणाम रक्तातील साखरेवर परिणाम करतो, असे डॉ. मिश्रा यांनी स्पष्ट केले.

नाईट शिफ्ट असणाऱ्यांनी काय करावे ?

जर रात्रीच्या वेळी काम टाळणे शक्य नसेल, तर तास-दोन तासांनी तुम्ही जरा फिरून या. रात्रीचे जेवण हे पौष्टिक घ्या. हलका आहार, जंकफूड खाऊ नका. रात्री कोक-कोल्ड्रिंक्स पिऊ नका. मुख्य म्हणजे व्यायामासाठी वेळ काढा. सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा शक्य असेल अशा वेळी नियमित व्यायाम करा. रात्री वेळेत झोपणे, नियमित आणि योग्य आहार-विहार, नियमित व्यायाम यामुळे मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. दिवसा काम करणाऱ्या लोकांनाही टाईप २ मधुमेह होऊ शकतो. त्यांच्यामध्येही व्यायामाचा अभाव, अयोग्य जीवनशैली असल्याचे दिसून येते, असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने