हमासच्या हल्ल्यात दोन भारतीय महिला सैनिकांना वीरमरण, ३०० हून अधिक जवान शहीद

इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आजचा १० वा दिवस आहे. या युद्धात हजारो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. तसेच शेकडो सैनिक आणि दहशतवादीदेखील या युद्धात मारले गेले आहेत. दरम्यान, या युद्धात दोन भारतीय वंशाच्या महिला सैनिक शहीद झाल्याची बातमी समोर आली आहे. या दोन्ही महिला सैनिक ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्र हल्ल्यात शहीद झाल्या. इस्रायली सैन्यासह तिथल्या भारतीय समुदायाने या वृत्ताची पुष्टी केली आहे.

लेफ्टनंट ऑर मोजेस (२२) आणि इन्स्पेक्टर किम डोक्राकर अशी या हमासच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय वंशाच्या महिला सैनिकांची नावं आहेत. ऑर मोजेस होम फ्रंट कमांडमध्ये कार्यरत होती, तर किम डोक्राकर सीमा पोलीस दलात तैनात होती. या युद्धात इस्रायलचे २८६ सैनिक आणि ५१ पोलीस शहीद झाले आहेत.




इस्रायलमधील भारतीयांनी दिलेल्या माहितीनुसार तिथल्या भारतीय वंशाच्या मृतांची संख्या वाढू शकते. कारण अनेक इस्रायली नागरिकांना हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलं आहे. यापैकी बहुसंख्य ओलिसांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे त्यात भारतीय वंशाचे लोक असण्याची देखील शक्यता आहे. भारतीय वंशाची महिला शहाफ टॉकर ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यात थोडक्यात वाचली.

शहाफचे आजोबा याकोव टॉकर हे १९६३ साली मुंबईहून इस्रायलला गेले. शहाफने हल्ल्याबद्दल माहिती देताना सांगितलं की ती आणि तिचा मित्र यानिर अजून त्या धक्क्यात आहेत. ७ ऑक्टोबरला दक्षिण इस्रायलमध्ये आयोजित एका पार्टीसाठी ती यानिरबरोबर गेली होती. अचानक त्यांना आकाशात अनेक क्षेपणास्रं पाहिली. काही क्षेपणास्रं आसपास पडताना पाहिली. आगीचे लोळ पाहून आणि स्फोटांचा आवाज ऐकून तिथले लोक सैरावैरा धावू लागले. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन करून शहाफ आणि यानिरसह तिथले बहुसंख्य लोक तिथून बाहेर पडले आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने