तुम्ही रोज दही खाल्ले, तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल?

तुम्ही रोज दही खाल्ले, तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…दही हा सर्वसमावेशक दुग्धजन्य पदार्थ आहे. त्याची आंबट चव आणि क्रीमसारखे दिसत असल्यामुळे अनेकांना ते खायला आवडते. जेवण, स्नॅक्स व गोड पदार्थांची चव ते आणखी वाढवते. दही खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदेही आहेत. त्यात प्रो-बायोटिक्स, प्रोटिन्स आणि आणखी महत्त्वाचे पोषण घटकदेखील आहेत. त्याचमुळे अनेकांच्या आहारातील हा महत्त्वाचा पदार्थ आहे.

पण, तुम्ही रोज दह्याचे सेवन केले पाहिजे का? जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात दह्याचा समावेश केला, तर तुमच्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो? याच प्रश्नाचे उत्तर आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊ या.



याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना दिल्लीच्या धर्मशीला नारायणा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या मेडिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे ज्येष्ठ सल्लागार डॉ. महेश गुप्ता सांगतात, “रोज दही खाण्याचे शरीरासाठी अनेक फायदे असू शकतात. हा प्रो-बायोटिक्सचा चांगला स्रोत आहे; जो आतड्यांचे आरोग्य आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो. त्याचबरोबर त्यामध्ये कॅल्शियम, प्रोटिन्स आणि महत्त्वाची व्हिटॅमिन्सही असतात.”

याबाबत सहमती दर्शवताना, गुरुग्राम येथील नारायणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या पेडिएट्रिक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी व हेपेटोलॉजी विभागाच्या क्लिनिकल लीड व वरिष्ठ सल्लागार डॉ. शिवानी देसवाल यांनी सांगितले, “दही तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकते. त्याचबरोबर तुमचा मूड सुधारू शकते आणि संज्ञानात्मक कार्य म्हणजेच तुमची धारणा, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, स्मरणशक्ती, आकलनशक्ती, निर्णय घेण्याची क्षमता व भाषा क्षमता सुधारू शकते.”

“दह्यामध्ये फक्त व्हिटॅमिन डी हे एकच व्हिटॅमिन नसते. हाडे आणि दात यांच्या मजबुतीसाठी कॅल्शियमची; तर स्नायूंच्या देखभाल व दुरुस्तीसाठी प्रोटिन्सची मदत होते. दह्यामध्ये व्हिटॅमिन बी चयपचय व ऊर्जा निर्माण करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते.”

डॉ. शिवानी देसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, वजन नियंत्रणासाठीही दही मदत करू शकते. कारण- त्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटिन्स घटक आहे; ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि एकूण कॅलरीजच्या सेवनाचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर दही हा सोईस्कर स्नॅक्सचा पर्याय आहे आणि संतुलित आहाराचा तो एक भाग आहे.

दह्याचे फायदे लक्षात घेऊन डॉ सांगतात, “एखादी व्यक्ती त्याच्या रोजच्या आहारात दह्याचा समावेश करू शकते. पण, त्याच्या आहाराच्या गरजा आणि प्राधान्य कशाला द्यावे हे त्याने लक्षात घेतले पाहिजे. तुम्हाला जर दही खायला आवडत असेल आणि तुमच्या संतुलित आहारात त्याचा समावेश करीत असाल, तर तो एक आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो. फक्त तुम्ही ते किती प्रमाणात खात आहात ते लक्षात घ्या आणि शक्य असेल तेव्हा साधा व कमी फॅट्स असलेला दह्याचा प्रकार निवडा.”

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, जास्त प्रमाणात दह्याचे सेवन केल्यास कॅलरीजचे प्रमाण अतिजास्त होऊन साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे संयम अत्यंत महत्त्वाचा आहे.

दही खाताना काय करावे आणि काय टाळावे?
  • साधे दही निवडा; ज्यात साखर किंवा कोणताही आर्टिफिशियल फ्लेवर नसेल.
  • दही खरेदी करताना एक्स्पायरी डेट चेक करा आणि दही ताजे असल्याची खात्री करा.
  • आतड्यांच्या आरोग्यासाठी योग्य असलेले दही निवडा.
  • पोषक घटकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी फक्त दह्यावर अवलंबून राहू नका. तुमच्या आहारात बदल करीत राहा.
  • तुम्हाला दुग्धजन्य पदार्थांची अॅलर्जी किंवा लॅक्टोज असहिष्णुता असल्यास दह्याचे सेवन करू नका.
  • जास्त प्रमाणात दही खाऊ नका; संतुलित आहारासाठी संयम राखणे आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने