गाझातील रुग्णालयात भीषण स्फोट, ५०० जणांचा मृत्यू; इस्रायलकडून हवाई हल्ला?

गेल्या आठवड्याभरापासून इस्रायल आणि हमास यांच्यात घमासान युद्ध सुरू आहे. ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर क्षेपणास्र डागल्याने इस्रायलनेही युद्धाची घोषणा केली. तेव्हापासून गाझापट्टीवर नरसंहार सुरू आहे. इस्रायल लष्कराने आता जमिनीवरील लढाई सुरू केली आहे. या दरम्यान, गाझातील अल-अहली या सिटी रुग्णालयात भीषण मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात तब्बल ५०० जणांचा मृत्यू झालाय, हमास संघटित आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. एपी या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.




हमासने युद्ध पुकारल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीतील नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. तसंच, इस्रायलने तेथील मानवतावादी सुविधाही खंडित केल्या आहेत. त्यामुळे तेथील नागरिक जीव मुठीत घेऊन मिळेल त्या ठिकाणी स्थायिक होत आहेत. अनेक रुग्णालयातील इंधन साठाही संपत आल्याने रुग्णांचा जीवही धोक्यात आला आहे. दरम्यान, गाझातील अल अहली रुग्णालयात भीषण स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात जवळपास ५०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटामुळे रुग्णालय इमातीला भीषण आग लागली. या आगीत होरपळून अनेकांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णालय परिसरातील मैदानात मृतांचा खच पडला असून इमारतीच्या खिडक्या-दारेही तुटली आहेत. या मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. तर, त्यांच्या मृतदेहांशेजारी ब्लँकेट, शाळेच्या बॅगा आणि इतरस्त्र वस्तू पडल्या होत्या.

हल्ल्याची जबाबदारी कोणाची?

परंतु, हा हल्ला कोणी केला हे अद्याप अस्पष्ट आहे. कारण, हसामने इस्रायलवर दावा केला आहे. इस्रायलने रुग्णालयावर हवाई हल्ला केल्याचं हमासकडून सांगण्यात येतंय. तर, इस्रायली लष्कराने हमासला या हल्ल्यामागे जबाबदार धरले आहे.

प्रादेशिक परिषद रद्द

दरम्यान, इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इस्रायल आणि अम्मान दौऱ्यावर जाणार होते. अम्मान येथे पॅलेस्टाईन राष्ट्राध्यक्षांनी प्रादेशिक परिषद आयोजित केली होती. परंतु, गाझा पट्टीतील हल्ल्यामुळे प्रादेशिक परिषद रद्द करण्यात आली आहे. या प्रादेशिक परिषदेत पॅलेस्टईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी सहभागी होणार होते. तर, जो बायडेन आता फक्त इस्रायलला भेट देणार असल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे.

इस्रायलकडून दोन गावांमध्ये हल्ला

इस्रायलने मंगळवारी पहाटे दक्षिण गाझामधील दोन गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बवर्षांव केला अशी माहिती पॅलेस्टिनी नागरिकांनी दिली. इस्रायलने शुक्रवारी उत्तर गाझामधील लोकांना दक्षिण गाझाकडे जाण्याचे आदेश दिले होते, त्याच भागावर इस्रायलने हल्ला केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने