Tata Literature Festival : मुंबईत आजपासून साहित्यिकांचा मेळा; जगभरातील १५० हून अधिक लेखक, स्टोरीटेलर सहभागी होणार!

जगविख्यात साहित्य संमेलन अर्थात ‘टाटा लिटरेचर फेस्टिव्हल’ला आजपासून (ता. २५) मुंबईत सुरुवात होणार आहे. पाच दिवसांच्या या संमेलनात ज्येष्ठ विचारवंत सलमान रश्दी, इलिफ शाफक आणि एंड्यू कुरकोव यांच्यासह २० देशांतील १३० हून अधिक लेखक, पत्रकार, कवी, कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. हा १४ वा लिटरेचर फेस्टिव्हल असून तो पाच दिवस सुरू राहणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.

साहित्य संमेलनाच्या पहिल्या दोन दिवसांचे सत्र (ता. २५, २६) ऑनलाईन पद्धतीने होईल; तर शुक्रवारपासून (ता. २७) संमेलन मुंबईतील तीन ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने सुरू होईल. पहिल्या ऑनलाईन सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक, विचारवंत सलमान रश्दी, इलिफ शाफक आणि एंड्यू कुरकोव सहभागी होणार आहेत. शुक्रवारपासून फेस्टिव्हल एनसीपीए नाट्यगृह आणि वांद्रेच्या सेंट पॉल इन्स्टिट्यूट तसेच टायटल वेव्हस बुकस्टोअरमध्ये रंगणार आहे.




या संमेलनाची सुरुवात ‘फॉर दी लव ऑफ वर्ल्ड-अनिल धारकर’ या सत्राने होणार आहे. या कार्यक्रमात खासदार, लेखक शशी थरूर हे ब्रिटिश अमेरिकन लेखक, टीव्ही होस्ट मेहदी हसन यांच्यासोबत सहभागी होणार आहेत. इंग्रजी भाषेचे प्रेम अणि भाषेचा भारतीय आणि जगातील इतर भाषेसोबतच्या संबंधांवर चर्चा होईल.

जगभरातील १५० मान्यवर

टाटा लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये जगभरातील १५० हून अधिक लेखक, स्टोरीटेलर सहभागी होणार आहेत. फिक्शन, काव्य, गणित, खेळ, आरोग्य, अर्थ, समाज, निसर्ग आणि फूड संस्कृतीवर चर्चा रंगणार आहे. एमी फर्नांडिस, सॅम मिलर, सुधा मूर्ती, प्रल्हाद कक्कर, मणिशंकर अय्यर, शांता गोखले, जेरी पिंटो, अनुजा चौहान, कुणाल विजकर, मनोरंजन ब्यापारी, राजदिप सरदेसाई, गुरुचरण दास, इसबेला हम्माद, शोभा डे यांचा सहभाग असणार आहे.

सी. एस. लक्ष्मींचा गौरव

प्रसिद्ध तमिळ लेखिका आणि साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या सी. एस. लक्ष्मी यांना संमेलनात ‘टाटा लिटरेचर लाईफटाईम ॲचिव्हमेंट पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. अरुणाचल प्रदेशस्थित पद्मश्री पुरस्कार विजेत्या ममंग दाई तसेच बिनोद कोनारिया यांचाही या वेळी गौरव करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने