संपूर्ण जग आता 'मेड इन इंडिया' स्मार्टफोन वापरतंय, ही अभिमानाची बाब! PM मोदींनी व्यक्त केला आनंद

इंडिया मोबाईल काँग्रेसच्या सातव्या एडिशनचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी मोदींनी भारत देश टेलिकॉम आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कसा पुढे जात आहे याबाबत माहिती दिली. दिवसेंदिवस तंत्रज्ञानाची होत असलेली प्रगती पाहता, 'दि फ्युचर इज हिअर अँड नाऊ' ही उक्ती सार्थ होत असल्याचं ते म्हणाले.




यावेळी पंतप्रधान मोदींनी 'मेक इन इंडिया' मोहिमेच्या यशाबद्दल देखील आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, "गुगलने नुकतीच घोषणा केली आहे, की ते आपले पिक्सल फोन भारतात बनवणार आहेत. सॅमसंगचे फोल्ड 5 आणि अ‍ॅपलचे आयफोन 15 हे आधीपासूनच भारतात तयार होत आहेत. एकूणच संपूर्ण जगभरात आता 'मेड इन इंडिया' मोबाईल वापरले जात आहेत, या गोष्टीचा आज सर्वांनाच अभिमान आहे."

दिल्लीमध्ये 27 ते 29 ऑक्टोबर यादरम्यान इंडिया मोबाईल काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय परिषदेमध्ये 5G, 6G, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या तंत्रज्ञानावर प्रकाश टाकला जाईल. तसंच सेमीकंडक्टर उद्योग, हरित तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा इत्यादींशी संबंधित समस्यांवर चर्चा होणार आहे. यासोबतच नवीन स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी आणि प्रस्थापित उद्योजकांमध्ये परस्पर संबंध वाढवण्यासाठी 'अस्पायर' हे अभियान देखील राबवण्यात येणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने