पाकिस्तानविरुद्ध झाला वर्ल्डकप क्रिकेटच्या इतिहासातील दुर्मिळ रेकॉर्ड; पदार्पणात नेदरलँडच्या खेळाडूने जग जिंकले

आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये आज शुक्रवारी दुसरी लढत पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात झाली. या लढतीत प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानने २८६ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल नेदरलँडचा डाव ४१ षटकात २०५ धावात संपुष्ठात आला. पाकिस्तानने ही लढत ८१ धावांनी जिंकली.

या लढतीत पाकिस्तानने सहज विजय मिळवला असला तरी नेदरलँडकडून एका खेळाडूने असा विक्रम केला आहे जो वर्ल्डकप क्रिकेटच्या इतिहासात फक्त याआधी दोन वेळा झाला होता. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत टॉस जिंकून नेदरलँडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नेदरलँडच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानची अवस्था ३ बाद ३८ अशी झाली होती.




पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान आणि सैद शकील यांनी प्रत्येकी ६८ धावा करून संघाला समाधानकारक धावसंख्या उभी करून दिली. नेदरलँडकडून बास डे लीड सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ९ षटकात ६२ धावा देत ४ विकेट घेतल्या. गोलंदाजीत कमाल केल्यानंतर बास थांबला नाही. जेव्हा फलंदाजी करण्याची वेळ आली तेव्हा त्याने ६८ चेंडूत २ षटकार आणि ६ चौकारांसह ६७ धावांची खेळी केली. अर्थात या खेळीचा संघाला उपयोग झाला नाही. पण वर्ल्डकप क्रिकेटच्या इतिहासातील एका दुर्मिळ विक्रमाची नोंद झाली.

वर्ल्डकप क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात ४ विकेट आणि ५० हून अधिक धावा करण्याची कामगिरी आतापर्यंत फक्त दोघा फलंदाजांना जमली होती. आता या अनोख्या विक्रमाच्या यादीत बास डे लीडचा समावेश झाला आहे. बासच्या आधी अशी कामगिरी फक्त दोन वेळा झाली आहे. सर्व प्रथम अशी कामगिरी झिम्बाब्वेच्या डंकन फ्लेचरने १९८३ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली होती. तर त्यानंतर १९९९च्या वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेच्या नील जॉन्सनने केनियाविरुद्ध ४२ धावात ४ विकेट घेतल्या होत्या आणि ५९ धावा देखील केल्या होत्या.

वर्ल्डकपच्या पदार्पणात ४ विकेट आणि ५० हून अधिक धावा करणारे...

१) डंकन फ्लेचर- विरुद्ध ऑस्ट्रेलिया ४२ धावात ४ विकेट, नाबाद ६९ धावा

२) नील जॉन्सन- विरुद्ध केनिया, ४२ धावात ४ विकेट आणि ५९ धावा

३) बास डे लीड- विरुद्ध पाकिस्तान, ६२ धावा ४ विकेट आणइ ६७ धावा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने