फाटक्या जीन्स, स्कर्टवर जगन्नाथ मंदिरात बंदी; प्रशासनाने सांगितलं, “इतरांच्या धार्मिक भावना…!”

गेल्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळांवर किंवा प्रार्थना स्थळांवर जाताना कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत, यासंदर्भात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. काही मंदिरांनी तोकड्या कपड्यांना बंदी घातल्यानंतर हा महिलांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रकार असल्याचीही टीका काहींनी केली. आता ओडिशाच्या सुप्रसिद्ध प्राचीन जगन्नाथ पुरी मंदिरातही कपड्यांसंदर्भात नियमावली तयार करण्यात आली असून येत्या जानेवारी महिन्यापासून या मंदिरात येणाऱ्या भक्तांना या नियमांचं पालन करावं लागणार आहे. इंडिा टुडेनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

१२व्या शतकात बांधण्यात आलेल्या जगन्नाथ पुरी मंदिराला दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भाविक भेट देतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मंदिर प्रशासनावर असते. त्यासंदर्भात प्रशासकीय समितीकडूनच निर्णय घेतले जातात. याचबाबतीत आता नियमावलीसंदर्भातील समितीनं निर्णय घेतला असून येत्या जानेवारी महिन्यापासून नवीन नियम लागू होणार आहेत.




काही दिवसांत नियमावली होणार जारी

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, मंदिरात काही लोक असभ्य प्रकारची वेशभूषा करून प्रवेश करत असल्याची तक्रार काही लोकांनी केली होती. त्या तक्रारीची दखल मंदिर प्रशासनानं घेतली असून त्यानुसार हा नियम बनवण्यात आला आहे. यानुसार,मंदिरात प्रवेश करताना फाटक्या जीन्स, स्लीवलेस कुर्ते, हाफ पँट, शॉर्ट्स असे कपडे घालण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय, कोणत्या प्रकारच्या कपड्यांना परवानगी असेल, यासंदर्भातली नियमावली काही दिवसांत जारी करण्यात येईल, असंही या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

“मंदिराचं पावित्र्य आणि महत्त्व अबाधित राखणं हे आमचं कर्तव्य आहे. पण दुर्दैवाने काही लोक इतरांच्या धार्मिक भावनांचा विचार न करता मंदिर परिसरात प्रवेश करत असल्याचं दिसून आलं आहे. काही लोक मंदिरात फाटक्या जीन्स, स्लीवलेस कुर्ते, शॉर्ट्स घालून येताना दिसले, जणूकाही ते समुद्र किनाऱ्यावर किंवा बीचवर फिरण्यासाठीच आले असावेत. मंदिर हे भगवंताचं घर असतं, मनोरंजनाचं ठिकाण नाही”, अशा शब्दांत जगन्नाथ पुरी मंदिर प्रशासन प्रमुख रंजन कुमार दास यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

सिंह दरवाजावरच अडवलं जाणार

दरम्यान, १ जानेवारी २०२४पासून नवे नियम लागू होतील. मंदिराच्या सिंह दरवाजावरच सुरक्षा रक्षकांकडून भाविक योग्य प्रकारच्या वेशभूषेतच प्रवेश करत असल्याची खातरजमा केली जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने