महिनाभर एकही चॉकलेट खाल्ले नाही तर शरीरात काय बदल होतील? आहारतज्ज्ञ सांगतात….

लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना चॉकलेट खायला आवडतं. त्यामुळे चॉकलेट खाणं सोडून देणं अनेकांना स्वप्नवत आणि अशक्य वाटू शकतं. त्यामुळे ते कायमचं सोडून देण्यापेक्षा महिनाभर खाणं बंद करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. कारण- आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांच्या मते, जेव्हा तुम्ही महिनाभर चॉकलेट खाणं बंद करता, तेव्हा तुमच्या शरीरात अनेक बदल होऊ शकतात.

“तुमची जीभ गोड चवीसाठी अधिक संवेदनशील होऊ शकते; जे पदार्थ तुम्हाला पूर्वी खूप गोड वाटायचे. कदाचित त्या पदार्थांचा तुम्ही आनंद घेऊ शकाल. चॉकलेटमुळे काही व्यक्तींच्या त्वचेवर पुरळ येऊ शकतात. त्यामुळे ते खाणं टाळल्यास तुमच्या त्वचेतही काही सुधारणा होऊ शकते.




सिंघवाल यांच्या म्हणण्यानुसार, तुम्हाला गोड आणि उच्च कॅलरीयुक्त पदार्थ खाण्याची जास्त इच्छा होणार नाही. तर डॉ अभिषेक गुप्ता, इमर्जन्सी मेडिसिन्स, रिजन्सी हॉस्पिटल यांनी सांगितलं की, काही लोकांना चॉकलेट खाणं बंद केल्यानंतर सुरुवातीला चॉकलेट खाण्याची इच्छा होणं आणि मूड बदलांचा अनुभव येऊ शकतो. कारण- त्यांच्या शरीरानं चॉकलेटच्या मूड वाढवणाऱ्या संयुगांच्या अभावाशी जुळवून घेण्यास सुरुवात केलेली असते.

महिनाभर चॉकलेट न खाण्याचे शरीराला काय फायदे होऊ शकतात ते जाणून घेऊ या.

महिनाभर चॉकलेट खाणं बंद केल्याचे अनेक फायदे होऊ शकतात.डॉ. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार चॉकलेटचं सेवन कमी केल्यानं शरीरातील कॅलरी आणि साखरेचं प्रमाण कमी होऊ शकतं. ते पुढे म्हणाले, “चॉकलेट खाणं बंद केल्यानं दात किडण्याचा धोका कमी होऊन दातांचं आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.” तर, सिंघवाल यांनी सांगितलं, “चॉकलेटमध्ये कॅलरीजचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते खाणं टाळल्यानं कॅलरी कमी होतात; ज्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.”

चॉकलेट खाणे बंद केल्याची लक्षणे

काही लोक पहिल्यांदा चॉकलेट खाणं बंद करतात तेव्हा लगेचच त्यांची चिडचिड होणं किंवा चॉकलेट खाण्याची इच्छा होणं, अशी लक्षणं दिसू शकतात; परंतु ही लक्षणं वेळेनुसार कमी होतात, असं डॉ. गुप्ता यांनी सांगितलं. तर सिंघवाल यांच्या म्हणण्यानुसार, काही लोकांना मूड बदलणं किंवा डोकेदुखी होणं अशा लक्षणांचाही अनुभव येऊ शकतो, तसेच जर तुम्ही याआधी नियमितपणे चॉकलेट खात असाल, तर तुमच्यामध्ये ही लक्षणं मोठ्या प्रमाणात दिसू शकतात. त्यामुळे अशा वेळी तुम्हाला चॉकलेटला आरोग्यदायी पर्याय असणारे पदार्थ खाण्यावर भर देणं गरजेचं आहे.

चॉकलेटला आरोग्यदायी पर्यायी पदार्थ कोणते?

आहारतज्ज्ञ सिंघवाल आणि डॉ. गुप्ता यांच्या मते- चॉकलेटला अनेक आरोग्यदायी पर्याय आहेत. उच्च कोको सामग्री (७० टक्क्यांपेक्षा अधिक) असलेल्या डार्क चॉकलेटसारख्या पर्यायांचा तुम्ही विचार करू शकता; ज्यामध्ये कमी साखर आणि जास्त अँटिऑक्सिडंट्स असतात.

तसेच आंबा, अननस, ब्लॅकबेरी यांसारख्या नैसर्गिक गोड फळांचाही तुम्ही विचार करू शकता.

खजूर आणि नट यांसारख्या आरोग्यदायी घटकांचा वापर करून घरगुती मिठाई सेवन करू शकता.

चॉकलेट खाणे कोणी टाळावे?

डॉ. गुप्ता यांच्या मते, गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स आजार (GERD) किंवा पूर्वी मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांनी याबाबत सावध असायला हवं. कारण- चॉकलेट्स काही प्रकरणांच्या लक्षणांमध्ये वाढ करू शकतात. तसेच जे कमी साखरेचा आहार घेतात, त्यांनी चॉकलेटच्या सेवनावर बारकाईनं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर सिंघवाल यांनी सांगितलं की, चॉकलेट खाल्ल्यानं ज्या लोकांची वैद्यकीय स्थिती बिघडू शकते, जसे की IBS (मलमूत्र विसर्जनाच्या वेळी त्रास होणे) अशा लोकांनी ते खाणं टाळावं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने