मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज सहा तासांचा ब्लॉक, प्रवास करण्याआधी जाणून घ्या पर्यायी मार्ग

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी (९ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल सहा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक असेल. हा ब्लॉक काही वेळापूर्वी सुरू करण्यात आला आहे. पुढच्या सहा तासांमध्ये महाराष्ट्र रेल्वे विकास महामंडळ चिखले पुलाजवळ गर्डर टाकण्याचं काम करणार आहे. या कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) एक्सप्रेसवेरील पुण्याहून मुंबईला येणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. त्याऐवजी पर्यायी मार्ग खुले केले आहेत. या सहा तासांसाठी सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी आणि अवजड वाहने) वाहतूक बंद करण्यात आली आहे.

द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या दिशेने ढेकू गावाजवळ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हायवे ट्राफिक मॅनेजमेन्ट सिस्टीम अंतर्गत गँन्ट्री उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी बुधवारी (८ नोव्हेंबर) दुपारी दोन ते अडीच या वेळेत गँन्ट्री बसविण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे कालही या मार्गावर ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला होता.




राज्य परिवहन विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी वाहतूक ब्लॉकसंबंधी एक अधिसूचना जारी केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी द्रुतगती महामार्गावरील वाहतूक इतर पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून पुण्याहून मुंबईला येणाऱ्या आणि मुबईहून पुण्याला जाण्यासाठी पनवेलमधून बाहेर पडणाऱ्या वाहनांसाठी पुणे राष्ट्रीय महामार्ग करंजाडेहून कळंबोलीच्या दिशेने वळवण्यात आला आहे.

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी बोरले टोल नाक्याजवळ पोहोचण्याआधी लागणाऱ्या शेडुंग फाट्यावरून वाहतूक पनवेलच्या दिशेने वळवण्यात आली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने पुण्याहून मुंबईला येणाऱ्या हलक्या वाहनांची वाहतूक खोपोलीवरून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर वळवण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने